कोट्यवधी खर्चून साकारलेला सिथेंटिक ट्रॅक मातीत ! | पुढारी

कोट्यवधी खर्चून साकारलेला सिथेंटिक ट्रॅक मातीत !

सुनील जगताप

पुणे : म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅकच अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे मातीत घालण्यात आला आहे. या स्टेडियममध्ये चक्क दुचाकी रॅलीची स्पर्धा घेतली असून, कोट्यवधी खर्चून तयार केलेल्या ट्रॅकवर माती टाकून तो खराब करण्यात आल्याची तक्रार काही खेळाडूंनी केली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. मात्र, या ट्रॅकवरच दुचाकी रॅली स्पर्धा आयोजित करून या ट्रॅकची दुरवस्था झाली असल्याचे समोर आले आहे. रविवारी झालेल्या दुचाकी रॅलीच्या स्पर्धेसाठी चार दिवसांपासून त्याठिकाणी तयारी सुरू होती. मोठ्या डंपरमध्ये माती आणून त्या ट्रॅकवर टाकण्यात येत होती. त्याचबरोबर त्याठिकाणी बुलडोझरने माती सपाटीकरणही केले जात होते. पर्यायाने त्या ट्रॅकची मोठी हानी झाली असल्याचे समोर आले आहे.

क्रीडासंकुलातील कोणतेही स्टेडियम उपलब्ध करून देत असताना इतर वेळी अधिकारी अनेक अटींचा पाढा वाचून दाखवत असतात. मात्र, या रॅलीच्या आयोजकांना मात्र कोणाच्या सांगण्यावरून त्वरित परवानगी देण्यात आली आहे, अशी चर्चा स्टेडियममध्ये सुरू होती. त्यामुळे या सर्वच प्रकरणाचा महाराष्ट्र शासनाकडून तसेच क्रीडामंत्र्यांकडून दखल घेतली जाणार का, असा प्रश्न खेळाडूंसह प्रशिक्षकांनी उपस्थित केला आहे.

काही तासांच्या दुचाकी रॅलीसाठी बालेवाडी येथील करोडो रुपयांचा सिंथेटिक ट्रॅक वापरण्यात आला आहे. वास्तविक पाहता दुसर्‍या ठिकाणीही व्यवस्था होऊ शकली असती. मात्र, क्रीडा अधिकार्‍यांच्या अनागोंदी कारभारामुळे सराव करणार्‍या खेळाडूंना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. क्रीडासंकुलाचे केवळ वाटोळे करणे आणि कोणाचा तरी वैयक्तिक स्वार्थ साधण्यात अधिकारी गुंतलेले आहेत. शासनाने संबंधित अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी.
                             – लतेंद्र भिंगारे (अध्यक्ष, क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य)

वास्तविक पाहता फुटबॉल आणि अ‍ॅथलेटिक्स असे एकत्रित हे मैदान आहे. संबंधित संयोजकांकडून या मैदानाची मागणी झाली होती. सध्याच्या परिस्थितीत या ट्रॅकचे आयुष्य संपलेले असून, नवीन ट्रॅक बसविण्याबाबत शासनाला यापूर्वीच पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे.
                        – सुधीर मोरे (सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय)

Back to top button