सर्वेक्षणासाठी दोन दिवसांची मुदतवाढ | पुढारी

सर्वेक्षणासाठी दोन दिवसांची मुदतवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून आढावा घेतला जात आहे. त्यानुसार पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा आढावा शुक्रवारी (2 फेब—ुवारी) मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव घेणार आहेत. दरम्यान, सर्वेक्षणासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मराठा समागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून राज्यभरातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन केले जात आहे. हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

सुरूवातीचे दोन-तीन दिवस सर्वेक्षणाला असंख्य अडचणी आल्या होत्या. राज्यात एकाचवेळी सर्वेक्षणाची माहिती भरण्यात येत असल्याने तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयोग, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) यांच्या सहकार्याने तांत्रिक अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. तरी देखील काही ठिकाणी अद्याप अडचणी येत आहेत. सर्वेक्षणाचे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्याने दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे सदस्य डॉ. जाधव हे 2 फेब—ुवारीला पुणे दौर्‍यावर येत आहेत.

या दौर्‍यात केवळ पुणे जिल्ह्याचा किंवा पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांचा आढावा पुण्यातून घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात 55 टक्के काम पूर्ण
जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दहा लाख 81 हजार 795 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट असून, पाच लाख 90 हजार 530 घरांचे म्हणजेच सुमारे 55 टक्के सर्वेक्षण झाले आहे. तर अजूनही सुमारे 50 लाख घरांचे शिल्लक आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांची मुदतवाढ मिळाल्यामुळे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे.

पाच दिवस वाढवून द्या : महापालिकेची शासनाकडे मागणी

मराठा समाजाचे मागासलेपण जाणून घेण्यासाठी हाती घेतलेल्या सर्वेक्षणाच्या कामासाठी आणखी पाच दिवस वाढवून द्या, अशी मागणी महापालिकेने केली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत 66 टक्के काम झाल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासून महापालिका हद्दीत मराठा समाजाचे मागासलेपण जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी तीन हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 7 लाख 58 हजार कुटुंबांचा सर्व्हे झाला आहे. परंतु, या सर्वेक्षणाची मुदत 31 जानेवारीपर्यंत असल्याने एका दिवसात पाच लाख मिळकतींचा सर्व्हे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे उर्वरित कामासाठी पाच दिवस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी महापालिकेने आयोगाकडे केली आहे. दरम्यान, संध्याकाळी उशिरा आयोगाने संपूर्ण राज्यातील सर्वेक्षणाची मुदत दोन फेब—ुवारीपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.

Back to top button