30 कोटींची स्वच्छ हवा ! तरीदेखील शहरातील धूळ काही हटेना | पुढारी

30 कोटींची स्वच्छ हवा ! तरीदेखील शहरातील धूळ काही हटेना

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वायुप्रदूषण तसेच, धुळीचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. शहराची हवा स्वच्छ करण्यासाठी महापालिकेकडून तब्बल 30 कोटींचा खर्च करून विविध उपाययोजना करीत नवनवे प्रयोग करण्यात येत आहेत; मात्र शहराची हवा अधूनमधून अतिधोकादायक पातळीवर पोहोचत असल्याचे प्रदूषण पातळी काही घटत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहर झपाट्याने फुगत चालले आहे. लोकवस्ती वाढत असल्याने सर्वत्र गृहप्रकल्प उभे राहत आहे. तसेच, खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. बांधकामे व बेसुमार वाहनांमुळे शहरातील हवा खराब झाली आहे. दिवाळीच्या हंगामात आणि हिवाळ्यात शहराची हवा अतिधोकादायक स्थितीत आली होती. उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नियम न पाळणार्‍या बांधकामाच्या ठिकाणी कारवाई केली जात आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेस वाहने तसेच, चौकाचौकांत लावण्यासाठी यंत्रे मिळाले आहेत.

प्युरिफिकेशन फाउंटनसाठी 3 कोटी 90 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. रस्ते साफसफाईचे वाहनांसाठी 1 कोटी 75 लाख खर्च करण्यात आला आहे. फॉग कॅननच्या 5 वाहनांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. मोशी कचरा डेपोतील यंत्रणेसाठी 1 कोटीचा खर्च करण्यात आला आहे. या यंत्र आणि वाहनांचे संचलन करण्यासाठी हायटेक सर्व्हिसेस या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. सहा महिने कामांची मुदत आहे.

ठेकेदारावर 23 कोटींचा खर्च आहे. असा सुमारे तब्बल 30 कोटींचा खर्च महापालिका करीत आहे. इतका खर्च करूनही शहरातील हवा पूर्णपणे स्वच्छ झाल्याचे दिसत नाही. अधूनमधून हवेची पातळी अतिधोकादायक पातळीवर जाऊन पोहचत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास पिंपरी-चिंचवड शहराची अवस्था दिल्ली, मुंबई व पुणे या अतिप्रदूषित शहराच्या पंक्तीत जाऊन बसेल, अशी भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

एअर प्युरिफिकेशन सिस्टिम
आकुर्डी चौक, चिंचवड स्टेशन चौक, पिंपरी चौक, नाशिक फाटा, भोसरी पूल व कस्पटेवस्ती चौक अशा सहा ठिकाणी एअर प्युरिफिकेशन सिस्टिम बसविण्यात आली आहे. सभोवतालची हवा स्वच्छ करण्यासाठी व हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. यामुळे चौकातील 50 मीटर त्रिज्येमधील वायुप्रदूषण काढून टाकण्यास मदत होते. नऊ पातळ्यांवर गाळण्याची प्रक्रिया पद्धत वापरली जाते. त्यामुळे हवेतील पीएम 2.5, पीएम 10, एसओटू/ एनओटू/ एनओएक्स/सीओ/सीओटू सारखे वायू व हवेतील कॅडियम/ लीड/ पारा/ क्रोमियम/ झिंक/ कोबाल्टसारखे कण काढून टाकते. सभोवतालच्या हवेचे ऑनलाइन निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिम
ही यंत्रणा मोरवाडी चौक, चिंचवड येथील विसर्जन घाट, चिंचवडगाव चौक, रावेतमधील भोंडवे चौक, मोशी गोडाऊन चौक, तळवडे चौक, चिखली आरटीओ चौक, काळेवाडीतील एम. एम. स्कूल, कोकणे चौक, नेहरूनगर चौक, नाशिक फाटा, चिंचवडमधील रांका गॅस एजन्सीजवळ, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक अशा 23 ठिकाणी बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे उच्चदाब पंप व विशेष नोजल वापरून धुके तयार करण्यात येतात. हवेतील धुलिकणांना जड बनवून कमी केले जातात. ते जमिनीवर खाली आणते. त्यामुळे जवळच्या भागात उडण्यास प्रतिबंध होतो. हवेची आर्द्रता, तापमान कमी करते. वातावरण थंड राहण्यास मदत होते.

स्टेशनरी फॉग कॅनन
त्यासाठी 5 वाहने मोशी कचरा डेपो येथे कार्यान्वित करण्यात आले आहेत. ते धूळ व गंध नियंत्रणासाठी वॉटर मिस्ट टेक्नॉलॉजीअंतर्गत डिझाइन केले आहे. ही वाहने हवेतील धूळ कमी करतात. एक्यूआय सुधारते. आपत्कालीन अग्निशमनासाठी वापरले जाऊ शकते. पोर्टेबल असल्याने कोणत्याही ठिकाणी ही वाहने ओढून नेली जाऊ शकतात.

ट्रक मॉन्टेड फॉग कॅनन
शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर या प्रकाराची 5 वाहने फिरवून हवेतील धूळ कमी केली जाते. वॉटर मिस्ट तंत्रज्ञान वापरून मोबाईल डस्ट सप्रेशन व्हेईकल म्हणून डिजाईन केलेले हे वाहन आहे. रस्त्यांवरील जंक्शन, इमारती पाडणे, कचराकुंड्या परिसरातील हवेतील धूळ नियंत्रित करण्यासाठी ही वाहने वापरली जातात.

रोड वॉशर सिस्टिम
शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्ते
2 वाहनांद्वारे जलद व प्रभावीपणे साफ केले जात आहेत. एका शिफ्टमध्ये 40 किलोमीटर अंतराचा रस्ता धुऊन घेतला जातो. रस्त्यांसोबत पुतळे व उपकरणे धुण्यास हे वाहन वापरले जाते.

Back to top button