पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद मोहोळवर गोळीबार करणार्या हल्लेखोरांनी आरडाओरडा करताना मारणेचे नाव घेतले आहे. त्यामुळे गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय या प्रकरणातील आरोपी गणेश मारणेला अंतरिम अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने सोमवारी आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी आरडाओरडा करत मारणेचे नाव घेतले असून, त्याचे साथीदार असल्याचे सांगितले आहे. हे अर्जदाराचा या गुन्ह्याशी काही संबंध असल्याचा अनुमान लावण्यासाठी पुरेसे असल्याचे न्यायालयाने नमूद केले. मारणेच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जावर येत्या शनिवारी (3 फेब्रुवारी) सरकार पक्ष म्हणणे मांडणार आहे.
मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणे हा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके गणेश मारणेचा कसून शोध घेत आहेत. मात्र, मारणेने पोलिसांना गुंगारा देत पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. मूळ तक्रारीत गणेश मारणेचे नाव आरोपी म्हणून नाही. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या रिमांड अहवालात गणेश मारणेला फरारी म्हणून दर्शविलेले नाही. त्यामुळे त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद मारणेच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक झाली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.