रेल्वेगाड्या स्वच्छ कधी होणार? रेल्वे प्रवाशांचा सवाल | पुढारी

रेल्वेगाड्या स्वच्छ कधी होणार? रेल्वे प्रवाशांचा सवाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  प्रवाशांना या राज्यातून त्या राज्यात आणि या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात प्रवासी सेवा पुरवणार्‍या रेल्वेगाड्या अलीकडच्या काळात खूपच अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. या अस्वच्छ गाड्या स्वच्छ कधी होणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. अस्वच्छ रेल्वेगाड्यांसंदर्भात रेल्वे प्रशासनाला दिवसेंदिवस अनेक तक्रारी येत आहेत. यात टि्वटरवर तर तक्रारींचा अक्षरश: पाऊसच पडला आहे. टि्वटरवर केलेल्या तक्रारीला संबंधित अधिकारी तत्काळ प्रतिसाद देत आहेत आणि त्या ठिकाणाची स्वच्छता देखील केली जात आहे. मात्र, सातत्याने येणार्‍या तक्रारींवरून स्वच्छतेबाबत रेल्वे प्रशासन ठोस असे कायमचे उपाय करण्यात यशस्वी होत नसल्याचे दिसत आहे.

…या आहेत प्रवाशांच्या तक्रारी
डीआरएम पुणे यांना टि्वटरवर अभिषेक नावाच्या प्रवाशाने सातारा डेमूच्या कंपार्टमेंटमधील रॉड तुटल्याचे सांगितले आहे. तर अभिषेक तांबट या प्रवाशाने 3 एसी डब्यामध्ये झुरळे असल्याचे सांगितले. तर नीलेश आणि गौतम रिशी या प्रवाशाने अस्वच्छ बेडरोलबाबत तक्रार केली आहे. गौरव वाळिंबेने पुणे-नांदेड एक्स्प्रेसमध्ये झुरळे असल्याचे सांगितले. रवी राजपूर या प्रवाशाने स्वर्ण जयंती एक्स्प्रेसमध्ये स्वच्छतागृहाशेजारीच कचर्‍याचा ढीग लागल्याचे सांगितले.

लांब पल्ल्याच्या गाड्यांत समस्या
पुण्यातून लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्यांची ये-जा असते. जवळच्या अंतरावर प्रवास करणार्‍या म्हणजेच पुणे-मुंबई यांसारख्या गाड्यांमध्ये कमी प्रमाणात अस्वच्छता दिसते. मात्र, राज्य व जिल्हे असा लांब पल्ल्याचा प्रवास करणार्‍या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे दिसत आहे.

Back to top button