शिक्षण सेवक उमेदवारांसाठी आणखी एक परीक्षा ; कामगिरी समाधानकारक नसल्यास सेवा समाप्त | पुढारी

शिक्षण सेवक उमेदवारांसाठी आणखी एक परीक्षा ; कामगिरी समाधानकारक नसल्यास सेवा समाप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष शिक्षक भरतीकडे लागलेले असताना आता शिक्षक भरतीमधून शिक्षण सेवक होणार्‍या उमेदवारांना आणखी एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होणार्‍या उमेदवारांची आता कौशल्य चाचणी घेतली जाणार असून, त्यात समाधानकारक कामगिरी नसलेल्या उमेदवारांची सेवा समाप्त केली जाणार असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

पवित्र संकेतस्थळावरील भरती प्रक्रियेत सेमी इंग्रजी शाळांसाठी नोंदवण्यात येणार्‍या मागणीला अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता धारण करणार्‍यांमधून शिफारस करण्यात येणार आहे. परंतु, अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे. या कौशल्य चाचणीत संबंधित शिक्षण सेवकाची कामगिरी असमाधानकारक असल्यास त्याची सेवा समाप्त करावी, अशी अट नियुक्ती आदेशात नमूद करावी, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये 19 जून 2023च्या शासन निर्णयानुसार सेमी इंग्रजी साधन व्यक्ती आणि 13 ऑक्टोबर 2023च्या शासन निर्णयानुसार इंग्रजी साधन व्यक्ती अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी. तसेच, आज मंगळवार (दि. 30 जानेवारी) पर्यंत पवित्र संकेतस्थळावरील जाहिरातविषयक कार्यवाही पूर्ण करावी, असेही स्पष्ट केले आहे.

 

Back to top button