पुणे : पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून केल्याप्रकरणी संजय तानाजी सोलंकर (वय 30, रा. वेताळनगर, चिंचवड) याला न्यायालयाने जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पी. पी. जाधव यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद केले आहे. ही घटना 1 नोव्हेंबर 2020 मध्ये घडली. याप्रकरणी 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी संजय हा दारू पिऊन घरी आला. तो मला व मयत तानाजी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. पण, आम्ही पैसे दिले नाहीत. याचा राग मनात धरून त्याने आम्हाला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, तानाजी यांच्या डोक्यात तांब्याची घागर घालून गंभीर दुखापत करत खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासून झाल्यानंतर उलटतपासणीमधील पुरावा व वैद्यकीय पुराव न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपीला शिक्षा सुनावली.