पाटसला शेतीच्या वादातून हवेत गोळीबार | पुढारी

पाटसला शेतीच्या वादातून हवेत गोळीबार

पाटस : पुढारी वृत्तसेवा :  पाटस (ता. दौंड) गारफाटा येथील भागवत व जाधवराव या दोन गटात शेतीच्या जागेवरून तुफान हाणामारी झाल्याने एका गटाने हवेत गोळीबार केला. याप्रकरणी बेकायदा जमाव जमवून हाणामारी केल्याप्रकरणी दोन्ही गटात यवत पोलिसात गुन्हे दाखल केले असल्याची माहिती यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. या घटनेतील भागवत व जाधवराव या दोन्ही कुटुंबीयांनी पाटस पोलिसात फिर्यादी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिकेत भागवत (वय 28, रा. पाटस गारफाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, धैर्यशील जाधवराव ,दिग्विजय जाधवराव, अभिजित जाधवराव, वीरसिंह जाधवराव, समीर जाधवराव, आसिफ शेख व अज्ञात अंगरक्षक यांनी अनिकेत भागवत याला हॉकी स्टीक, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

वीरसिंह जाधवराव याने त्यांच्याकडील असणार्‍या बंदुकीचा धाक दाखवून हवेत गोळीबार करून अनिकेतची चुलती वंदना, आजी शंकुतला यांना धक्काबुक्की केली. यावेळी अज्ञात 30 ते 40 महिलांनी वंदना यांना धक्काबुक्की केली. यामुळे त्यांच्या गळ्यातील दागिने तेथेच पडले असल्याने धैर्यशील जाधवराव दिग्विजय जाधवराव, अभिजित जाधवराव, वीरसिंह जाधवराव, समीर जाधवराव (सर्व रा. पाटस गारफाटा), आसिफ शेख व अज्ञात अंगरक्षक तर अज्ञात 30 ते 40 महिला यांच्याविरुध्द तक्रार दिली.

या प्रकरणाची दुसरी फिर्याद विरसिंह चंद्रशेखर जाधवराव (वय 35, रा. पाटस गारफाटा) यांनी दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, अभिजित राजु भागवत, अनिकेत विजय भागवत, कोमल दिग्विजय भागवत,गौरी अभिजित भागवत, शकुंतला सोनबा भागवत, वंदना संजय भागवत, सोनाली अनिकेत भागवत, मालन अशोक भागवत, ललिता राजु भागवत, दिग्विजय राजु भागवत (सर्व रा. पाटस गारफाटा) यांना 5 गुंठे जागा तुम्हाला प्रेमापोटी राहण्यास दिली आहे. मात्र, तुम्ही जास्त जागा का वापरता अशी विचारणा केली असता भागवत कुटुंबीयांनी फिर्यादी वीरसिंह व भाऊ धैयशील दीपक जाधवराव यास शिवीगाळ तसेच दमदाटी करून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. अभिजित राजु भागवत यांनी काठीने डाव्या हाताच्या पोटरीवर मारली व दिग्विजय दीपक जाधवराव याच्या पाठीवर मारहाण केली आहे. या परस्परविरोधी तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

Back to top button