Market Update : नव्या हंगामातील लसूण बाजारात | पुढारी

Market Update : नव्या हंगामातील लसूण बाजारात

शंकर कवडे

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात जुन्यासह नव्या हंगामातील लसूण दाखल होऊ लागला आहे. लसणाचा जुना हंगाम संपत आला असून, नवीन हंगाम सुरू झाला आहे. बाजारात दोन्हीही लसणाच्या आवकेच्या तुलनेत मागणी अधिक आहे. परिणामी, त्याच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात लसणाच्या दहा किलोला रविवारी (दि. 28) 2 हजार 700 ते 3 हजार 200 रुपये भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात 350 ते 400 रुपये किलो दराने लसणाची विक्री सुरू आहे.

मागील आठवड्यात मुंबईतील वाशी मार्केट चार दिवस बंद होते. त्यामुळे, पुण्यातील बाजारात टोमॅटोची आवक वाढून टोमॅटोच्या दरात घसरण झाली होती. मात्र, आत्ता मार्केट सुरू झाल्याने शेतकर्यांकडून टोमॅटो वाशी येथील बाजारात पाठविण्यास सुरवात केली आहे. परिणामी, पुण्याच्या बाजारात टोमॅटोची आवक घटून दरात वाढ झाली आहे. थंडीमुळे ढोबळी मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. परराज्यातून घेवड्याचीही आवक घटल्याने या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील जेष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 7 ते 8 टेम्पो, कर्नाटक, कर्नाटकातून येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 11 ते 12 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, मध्य प्रदेश व राजस्थान येथून 15 ते 16 ट्रक मटार, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो पावटा, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 6 टेम्पो इतकी आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 2 ते 3 टेम्पो, टोमॅटो सुमारे 8 ते 9 हजार क्रेट, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, पावटा 4 ते 5 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, घेवडा 5 ते 6 टेम्पो, कांदा सुमारे 100 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 50 टेम्पो इतकी आवक झाली होती.

पालेभाज्यांत स्वस्ताई
मार्केट यार्डातील तरकारी विभागात बहुतांश पालेभाज्यांची आवक मागणीच्या तुलनेत जास्त झाल्याने त्यांच्या दरात रविवारी (दि. 28) घसरण झाली. घाऊक बाजारात चाकवत आणि मुळ्याच्या गड्डीमागे प्रत्येकी तीन रुपये, हरभरा गड्डी दोन रुपये तर मेथी, शेपू, पुदीना आणि चवळईच्या भावात गड्डीमागे प्रत्येकी एक रुपयांनी घट झाली आहे़ रविवारी कोथिंबिरीची तब्बल पावणे दोन लाख जुडी, मेथीची 1 लाख जुडी तर हरभरा गड्डीची 4 ते 5 हजार गड्डी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक 50 हजार, मेथी 20 हजार जुड्यांनी वाढली. तर, तर, हरभरा गड्डीची आवक 2 हजार जुड्यांनी घटली. घाऊक बाजारात एका जुडीची 3 ते 12 रुपये तर किरकोळ बाजारात 10 ते 25 रुपये दराने गड्डीची विक्री सुरू होती.

Back to top button