नदीचा विकास नाही, तर पुनर्जन्म करा : वॉटरमॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंह

नदीचा विकास नाही, तर पुनर्जन्म करा : वॉटरमॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंह

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नदीमातेला केवळ हक्क मिळवून देण्यासाठी विकास करणे आवश्यक नसून, सर्वच नदींचा पुनर्जन्म करणे प्रत्येक भारतीयाचे काम आहे. त्याद़ृष्टीने प्रत्येकाने मोहीम हाती घेऊन त्यामध्ये सातत्य राखावे, असे आवाहन वॉटरमॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंह यांनी केले. रिवायवल संस्थेच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नद्यांच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी एकत्र आलेल्या 60 हून अधिक संस्था आणि व्यक्तींची संघटना पुणे नदी पुनरुजीवन (पीआरआर) भीमा खोर्‍यातील मुळा, मुठा, रामनदी, पवना, इंद्रायणी, भामा आणि भीमा या 7 नद्यांसाठी 'राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम सुरू केली आहे. जीवितनदी, एन. ए. पी. एम. जलबिरादरी, जलदिंडी प्रतिष्ठान, नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान, श्री आळंदी धाम सेवा समिती, मनहर्व फाउंडेशन, रंजाई, रोटरी क्लब ऑफ बाल्हेकरवाडी, निसर्गसेवक, सजग नागरिक मंच आणि इतर अनेक संस्थांद्वारे ही मोहीम एकत्रितपणे राबविण्यात आली. या मोहिमेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे सचिव संतोष ललवाणी, शैलजा देशपांडे यांसह विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. नद्यांच्या हक्कांसाठी पुण्याच्या नागरिकांनी 700 दिवसांचे साखळी उपोषण पूर्ण केले असून, त्यानिमित्त नदीकाठांवर विशिष्ट ठिकाणी 24 तास सामूहिक उपवास करण्यात आला. साखळी उपोषण चळवळींना पाठिंबा देण्यासाठी व्यक्ती आणि गटांकडून आंशिक उपवास करण्यात आले. साफसफाई, सेल्फी आणि ब्लॉग, पथनाट्ये किंवा इतर प्रकारची कला प्रदर्शने आदी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सेल्फी विथ द रिव्हर' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

सिंह म्हणाले, नद्यांचे वाहण्याचे स्वातंत्र्य आपण हरवले आहे. त्याचबरोबर स्वच्छता राखली जात नाही. जर नद्यांना त्यांचे हक्क द्यायचे असेल, तर आपल्याला प्रथम नदीचे स्टेटस रिपार्ट तयार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नदी प्रदुषणाबाबत ज्येष्ठ नागरिकांनी महाविद्यालयांमध्ये तर तरुणांनी शाळापातळीवर जनजागृती करावी. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी कमीत कमी पाच शाळांमधील विद्यार्थ्यांनी नदी काठावर भेट देऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. आगामी काळात अशा प्रकारची मोहीम राबवून नदीमधील स्वच्छता राबविणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news