Pune : शिरूर येथे सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न | पुढारी

Pune : शिरूर येथे सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर येथे सोन्याचे दुकान लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरट्यांना दुकानातील कर्मचार्‍याने विरोध केला. यात या कर्मचार्‍याला बंदुकीचा दस्ता मारल्याने कर्मचारी जखमी झाला. मात्र, या चोरट्यांनी जाताना गोळीबार केल्याने काही वेळ नागरिक भयभीत झाले. ही घटना रविवारी (28) रात्री 8 च्या सुमारास घडली. भिकाजी एकनाथ पंडित (वय 65) हे झटापटीत जखमी झाले असून, एकनिष्ठ असलेल्या व 34 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणार्‍या पंडित यांच्यामुळे सोन्यासह दुकानमालक यांचे प्राण वाचले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील भरवस्तीतील सुभाष चौकात जगन्नाथ धोंडीबा कुलथे सराफ या नावाचे माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे यांचे दुकान आहे.

त्या दुकानात भिकाजी पंडित हे कामाला आहेत. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोटारसायकलवरून मास्क घातलेले दोघे दुकानात शिरले व त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या वेळी चोरट्यांशी प्रतिकार करणारे पंडित यांनी चोर-चोर म्हणून ओरडून व त्यांना दुकानाबाहेर ढकलून दिले. यावेळी चोरटे माल काढ म्हणून धमकावत होते. दरम्यान, या चोरट्यांनी पंडित यांना बंदुकीचा दस्ता मारला. यामध्ये पंडित जखमी झाले. तर चोरट्यानी गोळीबार पळून जाताना गोळीबारदेखील केला.

गोळीबारानंतर चोरटे मोटारसायकलने पसार झाले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात घबराट उडाली असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी कुलथे यांचा दुकानासमोर धाव घेतली. दरम्यान, पंडित यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक गणेश जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, अभिजित पवार, सुनील उगले आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

Back to top button