ओझरला विघ्नहराच्या दर्शनासाठी गर्दी | पुढारी

ओझरला विघ्नहराच्या दर्शनासाठी गर्दी

नारायणगांव : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र ओझरच्या पुण्यनगरीत २६ जानेवारीपासून सलग येणाऱ्या शनिवार रविवार अश्या तीन दिवसाचे औचित्य साधून मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे व ग्रामस्थ यांनी श्री विघ्नहारास पहाटे पाच वाजता अभिषेक केला. आज प्रजासत्ताक दिन असल्याने श्री विघ्नहरा समोर केसरी पांढरा हिरवा या रंगाची फुलांची व पानांची सजावट करण्यात आली होती .

तसेच श्री विघ्नहर मूर्तीच्या बाजूला भारत देशाची शान असलेला तिरंगा ध्वज लावण्यात आला होता.सकाळी ७.३० वा व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह तसेच रात्री १०.३० वा.शेज आरती करण्यात आली. भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,अभिषेक कक्ष ,शुद्ध पिण्याचे पाणी,विश्रांतीसाठी मंदिरा लगत “विघ्नहर गार्डन’’अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.या कालावधीमध्ये भाविकांच्या निवासासाठी असणाऱ्या भक्तभवन क्र. १,२,३,४, च्या सर्व रूम बुकिंग पूर्ण झाल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सांस्कृतिक भवन व भक्तभवन हॉल मध्ये झोपण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.सकाळी चारही भक्तनिवास समोर अल्पदरात नाष्टा व चहाची सोय करण्यात आली.

आलेल्या भाविकांना सकाळी व सांयकाळी महाप्रसाद मिळावा म्हणून प्रसादाची वेळ वाढविण्यात आली. या दरम्यान शैक्षणिक सहलींसाठी थेट दर्शन व्यवस्था करण्यात आली.अल्पदरात निवास व्यवस्था ,नाष्टा .चहा व गरम पाणी देण्यात आले.सुरक्षिततेसाठी मुख्यप्रवेशद्वार ते मंदिर परिसरामध्ये CCTV कॅमेरे कार्यान्वित होते.कचरा उचलण्यासाठी देवस्थानच्या घंटा गाडीचा वापर करण्यात आला. गर्दीत नियोजन अध्यक्ष ,विश्वस्त मंडळ व कर्मचारी वर्ग यांनी केले.

Back to top button