चोरट्याकडून ज्येष्ठ महिलेला मारहाण ; पेठ गावात भीतीचे वातावरण | पुढारी

चोरट्याकडून ज्येष्ठ महिलेला मारहाण ; पेठ गावात भीतीचे वातावरण

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  पेठ (ता. आंबेगाव) येथे चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या घरात प्रवेश करीत तिच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. तसेच या वेळी केलेल्या मारहाणीत ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली. महिलेने आरडाओरडा केल्याने चोरटा पळून गेला. मंगळवारी (दि. 23) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. किसाबाई सीताराम ढमाले (वय 65, रा. पेठ, ता. आंबेगाव) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसाबाई ढमाले या गावात एकट्याच राहतात. मंगळवारी सायंकाळी घरातील वीज गेल्याने त्या शेजारी राहणारा भाचा शशिकांत ढमाले याच्या घरी गेल्या होत्या. त्याचवेळी चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला व तो बाथरूममध्ये लपून बसला.

किसाबाई या शशिकांतला वीज सुरू करण्यासाठी घरी घेऊन आल्या. शशिकांतने वीज सुरू केली आणि तो घरी निघून आला. किसाबाई यांनी घराच्या गेटला व दरवाजाला आतून कडी लावून त्या घरात काम करू लागल्या. त्या वेळी लपून बसलेल्या चोरट्याने त्यांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. किसाबाई यांनी आरडाओरडा करीत चोरट्याला पकडून ठेवले. चोरट्याने त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या गळ्याला जखम झाली. किसाबाई यांचा आवाज आल्याने भाचा शशिकांत व नातेवाईक घराबाहेर आले. त्या वेळी चोरटा घराच्या मागच्या दरवाजातून पळून गेला.

चोरट्याने केली होती रेकी
या घटनेत किसाबाई यांचे दागिने चोरीला गेले नसले तरी मारहाणीत त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. दरम्यान, संबंधित चोरटा दोन दिवस अगोदर पाणी पिण्यासाठी घरात आला होता. त्याचवेळी त्याने परिसराची रेकी केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. पेठ गावात याअगोदरही अशा प्रकारच्या दोन-तीन घटना घडल्या असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस पाटील सविता माठे यांनी केले आहे.

Back to top button