अजित पवार पांढर्‍या बगळ्यांचे नेते; शरद पवारांमुळे त्यांना महत्त्व : लक्ष्मण माने | पुढारी

अजित पवार पांढर्‍या बगळ्यांचे नेते; शरद पवारांमुळे त्यांना महत्त्व : लक्ष्मण माने

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री अजित पवार हे पांढर्‍या शुभ्र चकचकीत बगळ्यांचे नेते आहेत. त्यांच्याकडे सकाळी सहा वाजता कामे घेऊन सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी जात नाहीत, तर अधिकारी आणि ठेकेदार जातात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे त्यांना महत्त्व आहे. शरद पवारांची छत्रछाया नसती तर अजित पवारांना कोणी विचारलेही नसते, अशी टीका ‘उपरा’कार माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केली. अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना बारामतीला तीनवेळा मुख्यमंत्रिपद मिळाले. पण, विकास आणि मोठे काम झाले नाही. मीच बारामतीचा विकास केला, असे म्हणत नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली.

या पार्श्वभूमीवर लक्ष्मण माने यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, पूर्वी बारामतीचे विद्यार्थी शिक्षणासाठी फलटणला जात होते. आता राज्यासह देशातील विद्यार्थी शिक्षणासाठी बारामतीला येतात. विद्या प्रतिष्ठान अजित पवारांनी नाही तर शरद पवारांनी सुरू केले. आप्पासाहेब पवार आणि शरद पवारांनी अजित पवार राजकारणात नव्हते तेव्हा बारामतीचा विकास केला.

शरद पवार तीनवेळा मुख्यमंत्री होते. त्त्यांनी बारामतीसह राज्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासासाठी काम केले. बारामतीचा एक चौक चकाचक करणे म्हणजे विकास नाही. समाजाचा आर्थिक स्तर सुधारला आहे की नाही, हे पाहण्यासाठी शरद पवार व्यापार्‍यांची बैठक घ्यायचे. अजित पवारांनी तळागाळातील समाजासाठी एकतरी कार्यक्रम घेतला का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, हे आम्ही नाकारत नाही. मात्र, त्यांना आमच्या ताटातील भाकरी न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे. मनोज जरांगे यांच्या पाठीमागे भाजप व आरएसएसची शक्ती आहे. जरांगे मनुवादी आहेत, असेही लक्ष्मण माने म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button