Transfer News : ‘मलईदार’ हवेलीचा ‘मान’करी कोण होणार ? | पुढारी

Transfer News : 'मलईदार' हवेलीचा 'मान'करी कोण होणार ?

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे. येत्या एक दोन दिवसांत महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघतील. पुणे जिल्ह्यात महसूल विभागात हवेली प्रांतधिकारी पदभार राज्यातील महसुल विभागात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो तसेच हा विभाग मलईदार असल्याने येथे कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता विभागात आहे. ३० जानेवारी पर्यंत हवेलीचा ‘मान ‘ घेण्यासाठी कोण खरे ‘यशवंत’ होईल यावर शिक्कामोर्तब होईल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने महसूल विभागातील बदली पात्र अधिकाऱ्यांच्या याद्या राज्य शासनाकडून मागवल्या आहेत. या आठवडाभरात बदल्यांचे आदेश महसूल विभागाकडून जारी होतील. हवेली तालुक्यात खांदेपालट होणार असल्याने हवेली प्रांतधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा पुणे जिल्ह्यातील महसुलात जोरदार सुरू आहे. हवेली तालुक्यातील प्रांतधिकारीपद अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जात असल्याने येथील पदभार घेण्यासाठी अत्यंत वजनदार, प्रचंड वशिलेबाज व मोठ्या ताकतीच्या अधिकाऱ्याचेच हे शिवधनुष्य उचलण्याची क्षमता असते, असे आजपर्यंतचा इतिहास पाहीला तर दिसून येते. वास्तविक हवेली तालुक्यात प्रांतधिकारी म्हणुन येण्यासाठी अचानक कोणी प्रयत्न करत नाही अनेक दिवसांपासूनचे मोठे नियोजन करून ठेवलेले असते. सध्या हवेली तालुक्यात वर्णी लावावी म्हणून मंत्रालयातील एका वरिष्ठ वजनदार अधिकाऱ्याचे नाव महसूल मध्ये चर्चेत आहे.

तीन शिड्या पार कराव्या लागणार
हवेली प्रांतधिकारीपदाचा कारभार करुन गेलेले अधिकारी राज्यातील महत्वाच्या पदावर कामकाज करीत आहेत. सध्या महायुतीचे सरकार असल्याने शिवसेनेचे मुख्यमंत्री, भाजपचे महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अशा अवघड शिड्या पार करुन हवेलीवर वर्णी लावायची यात मोठी कसोटी असल्याने या तिन्ही शिड्या पार करेल तोच हवेलीचा शिलेदार होईल हे नक्की.

Back to top button