

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव या जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा जानेवारी महिन्यातच उणे झाला आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दहा वर्षानंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. धरणातील साठा 60 टक्के उणे झाल्यानंतर उजनीवरील बहुतेक पाणीपुरवठा योजना बंद पडतात. त्यामुळे आता प्रशासनाला पाण्याचे ठोस नियोजन करावे लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींना तर पुणे जिल्ह्यातील काही एमआयडीसींना उजनीतून पाणीपुरवठा होतो.
कर्जत- जामखेड, धाराशिव, सोलापूर, इंदापूर, बारामती शहरासह सोलापूर जिल्ह्यातील 100 हून अधिक ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनीवरच अवलंबून आहे. पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारीला उजनीचा मोठा आधार आहे. आता जानेवारीतच उजनी धरण उणे झाल्याने आगामी साखर हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होणार हे निश्चित. पुढच्या वर्षी सुपर अलनिनो वादळामुळे पावसाळा काही दिवस लांबणीवर पडू शकतो, असा हवामान खात्याचा पूर्वीचाच अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला उजनीतील पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागेल; अन्यथा पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
नेतेमंडळी गप्प
उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याला पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आणि आत्ताही सुरूच आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील राजकीय नेते मंडळी मात्र यावर भाष्य करत नाहीत, तसेच शेतकरी संघटनादेखील आवाज उठवत नाहीत. त्यामुळे यंदाचा दुष्काळ आणखी गडद होणार हे स्पष्ट दिसू लागले आहे.
हेही वाचा :