अंगणवाडी सेविका आंदोलन : आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी | पुढारी

अंगणवाडी सेविका आंदोलन : आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी

पिंपरी : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनास 50 दिवस पूर्ण झाले आहेत; मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले असून, सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे ज्या आमदारांच्या पाठबळावर सरकार बनते, त्या आमदारांच्या कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने मंगळवार (दि.23) सकाळी अकरा वाजता ‘आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी’ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिली.

अंगणवाडी सेविकांचे भरीव मानधनवाढ, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा, कामकाजासाठी नवीन मोबाईल/टॅब, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन आदी मागण्यांसाठी 4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडीताईंचे आंदोलन सुरू आहे. तेव्हापासून आजअखेर वरील मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आली. 22 जानेवारी रोजी आंदोलनास 50 दिवस पूर्ण होत आहेत. आंदोलनाच्या मागण्याबाबतचे निवेदन आमदारांना आंदोलनाच्या सुरुवातीलाच दिले आहे. मात्र, अजून त्याचा उचित परिणाम दिसलेला नाही.

अंगणवाडीताईंमध्ये एकल महिलांचे प्रमाण मोठे आहे. तसेच अनेक अंगणवाडीताईंचे घर त्यांच्या तुटपुंज्या मानधनावर कसेतरी चालते. त्यामुळे हे पन्नास दिवस त्यांची परीक्षा घेणारे ठरले आहेत. गेल्या 50 दिवसांपासून राज्यातील गावपाड्यामधील 70 लाख चिमुकल्यांना पूरक पोषक आहार मिळाला नाही. ही बालके पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित राहिली आहेत. मात्र याविषयी सरकार गंभीर नाही. म्हणून या आंदोलन व मागण्यांकडे आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी विविध ठिकाणी एकाचवेळी आमदारांच्या कार्यालयासमोर अंगणवाडीताईंचे धरणेआंदोलन होत आहे.

हेही वाचा

 

Back to top button