मोकाट कुत्र्यांवरील नसबंदी शस्त्रक्रिया : नेहरूनगरला आणखी एक डॉग शेड | पुढारी

मोकाट कुत्र्यांवरील नसबंदी शस्त्रक्रिया : नेहरूनगरला आणखी एक डॉग शेड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही कुत्री पादचार्‍यांवर हल्ला करून त्यांना जखमी करीत असल्याचे प्रकारही वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने नेहरूनगर येथील श्वान दफनभूमी येथील मोकळ्या जागेत डॉग केजसाठी शेड (पिंजरे) तयार करीत आहेत. त्यासाठी 1 कोटी 84 लाख खर्च अपेक्षित आहे. या शेडमुळे कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची संख्या दुप्पट होऊन कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास सहाय होणार आहे.

शहरातील काही हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते, चायनीज विक्रेते तसेच, रहिवाशी शिल्लक व खरखटे खाद्यपदार्थ उघड्यावर, मोकळ्या जागेत, नदीकाठी व नाल्यात फेकून देतात. त्या खाद्यपदार्थावर मोकाट कुत्री जगतात. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अंधारात ही मोकाट कुत्री नागरिकांचे चावे घेतात. पादचारी व दुचाकीस्वारांवर मोकाट कुत्री गटाने हल्ला करतात. कुत्र्यांनी चावे घेतल्याने नागरिक जखमी होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यात विशेषत: लहान मुले, महिला व ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. मोकाट व भटकी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या तक्रारी महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर प्राप्त होत आहेत. तसेच, सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेत या संदर्भात वारंवार तक्रार केल्या जात आहेत.

त्यावर उपाय म्हणून मोकाट कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रियेची संख्या वाढविण्याचा निर्णय महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने घेतला आहे. त्यासाठी नेहरूनगर येथील डॉग केज येथे मोठ्या संख्येने डॉग शेड उभारण्यात येणार आहेत. त्या कामासाठी स्थापत्य मुख्यालय विभागाने 2 कोटी 32 लाख 32 हजार 973 खर्चाची निविदा काढली होती. त्यात 6 निविदा प्राप्त झाल्या. त्यातील 5 निविदा पात्र ठरल्या. पी. ए. शितोळे इंजिनिअरींग अ‍ॅण्ड कॅन्स्ट्रक्शन यांची 1 कोटी 83 लाख 86 हजार 119 रूपयांची 22.23 टक्के कमी दराची निविदा पात्र ठरली आहे. कामाचा दर दहा टक्केपेक्षा अधिक दर कमी असल्याने ठेकेदाराकडून अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा करून घेण्यात आली आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. या कामात नवीन 100 डॉग शेड तयार होणार आहेत. पूर्वीचे 130 डॉग शेड आहेत. त्यामुळे डॉग शेडची संख्या 230 होणार आहे. नव्या 100 डॉग शेडमुळे दररोज 20 ते 25 कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करता
येणार आहेत.

नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या दुप्पट होणार

नेहरूनगर येथील शेड केज येथे अद्ययावत पद्धतीच्या डॉग शेडचे काम 2 वर्षांत पूर्ण करण्याची मुदत आहे. हे शेड तयार झाल्यानंतर मोकाट व भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येईल, असे पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button