रामनामाने दणाणला पुणे जिल्हा !

रामनामाने दणाणला पुणे जिल्हा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अयोध्या येथील भव्य अशा श्री राम मंदिरात सोमवारी (दि. 22) श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याचा उत्साह जिल्हाभरात पाहण्यास मिळाला. जिल्ह्यातील सर्वच मंदिरे फुलांच्या आकर्षक सजावटीने सजली होती. सर्वच मंदिरांवर विद्युतरोषणाई करण्यात आली होती. अनेक ठिकाणी कलशधारी महिलांची शोभायात्रा काढण्यात आली. जिल्हाभरातील वातावरण यामुळे श्री राममय झाल्याचे पाहावयास मिळाले. जेजुरीतील श्री खंडोबा मंदिरात नृत्यनाटिकेतून रामायण सादर करण्यात आले. याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यासह विविध ठिकाणी लाडू वाटप तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

माउली मंदिरात पुष्पवृष्टी, प्रसाद वाटप

अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरात सोमवारी (दि. 22) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माउलींच्या समाधीलगत भगवान श्री राम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंदिरात विद्युतरोषणाई करण्यात आली होती. सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत विष्णू सहस्रनामाचे पठण करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ह.भ.प. गोरक्ष महाराज उदागे यांची कीर्तनसेवा पार पडली.
साडेबारा वाजता पुष्पवृष्टी व भाविकांना खिरापत वाटप करण्यात आली. भाविकांना अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मंदिरात असलेल्या एलईडीवर दाखविण्यात आले.

श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा जेजुरीगडावर प्रचंड उत्साह

अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेमुळे देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरी येथील श्री क्षेत्र खंडोबा गडावर देखील याचा कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. खंडोबा मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जेजुरी देवसंस्थान, खंडोबा देवाचे मानकरी, पुजारी, ग्रामस्थ यांच्या वतीने पहाटे महापूजा, अभिषेक, रामरक्षा पठण, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. गडावर व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गडावर सासवड येथील नृत्य कला संस्कार संस्थेच्या कलाकारांनी नृत्यातून रामायण सादर केले. भंडार्‍याची उधळण व 'जय मल्हार', 'जय श्रीराम'च्या जयघोषाने गडावर राममय वातावरण झाले होते.

पुणे धर्मदाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडकर, अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, विश्वास पानसे, मंगेश घोणे, अभिजित देवकाते, अनिल सौन्दडे, खान्देकरी मानकरी मंडळ अध्यक्ष जालिंदर खोमणे, छबन कुदळे, अलका शिंदे, पश्चिम महाराष्ट्राचे धर्मप्रसारक राजेंद्र चोधरी, राजेंद्र पेशवे, कलासिद्धी नृत्यालयाच्या धनश्री स्वानंद लोमटे आदींची उपस्थिती होती.

श्री महागणपती मंदिरात विविध कार्यक्रम

अयोध्येतील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे 5 वाजता मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते श्रींना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी 6 वाजता रामयाग देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर, खजिनदार विजय देव यांनी सपत्नीक पूजा केली. साडेसहा वाजता सामूहिक रामरक्षापठण झाले. दुपारी 12 वाजता महापूजा व महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

logo
Pudhari News
pudhari.news