आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे पालकांचे डोळे.. | पुढारी

आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे पालकांचे डोळे..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणार्‍या 25टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जाणार्‍या आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक दरवर्षी डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात येत असते. यंदा मात्र जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी अद्यापही वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यातच खासगी इंग्रजी शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाच्या आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करून प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

आरटीईअंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दर वर्षी त्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत 3 ते 4 पट अर्ज येतात. त्यामुळे ऑनलाइन लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी करणे, ऑनलाइन यंत्रणेची तपासणी करणे, पालकांना आवश्यक दाखले काढून ठेवण्याचे आवाहन करणे, पालकांमध्ये प्रवेशासंदर्भात जागृती करणे तसेच लॉटरी आणि त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया आदींबाबत तारखा जाहीर केल्या जातात.

दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू केली जाते. त्यामुळे आरटीईचे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे राहतात. त्यामुळे या वर्षी प्रवेश प्रक्रिया नियोजित कालावधीत पूर्ण करावी. त्यासाठी लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

Back to top button