बारामतीतून 24 रोजी मराठा समाज मुंबईकडे कूच करणार | पुढारी

बारामतीतून 24 रोजी मराठा समाज मुंबईकडे कूच करणार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार बारामती शहर व तालुक्यातील मराठा समाज बुधवारी (दि. 24) मुंबईकडे कूच करणार आहे. तत्पूर्वी, या दिवशी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार आहे. सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 26 जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्यासह समाजाकडून आमरण उपोषण केले जाणार आहे. या आंदोलनासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत. याची तयारी सध्या गावोगावी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातून, वाडी-वस्तीवरून दहा ते बारा टेम्पो व सामानासाठी एक ट्रॅक्टर किंवा एक टेम्पो अशी प्रत्येक गावाची एक तयारी राहणार आहे.

बारामती तालुक्यातून दीड हजार वाहनांची व्यवस्था

तालुक्यातून एकूण एक ते दीड हजार चारचाकी वाहने व सामानाचे टेम्पो दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 7 वा. बारामतीतील कसबा येथील शिवाजी उद्यानात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोरगावकडे निघतील. मोरगावमध्ये आजूबाजूच्या गावांतील समाजबांधव सकाळी आठ वाजता एकत्र जमतील व त्यांच्यासह संपूर्ण बारामती तालुक्यातील समाजबांधव पुण्याकडे कूच करत देहूरोड येथे पोहोचणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे हे आंदोलन होणार असून ते शांततेच्या मार्गानेच होणार आहे. बारामती तालुक्यातील जे समाजबांधव आंदोलनासाठी येणार आहेत ते सर्व जण जरांगे पाटील यांच्या आदेशाशिवाय आंदोलन ठिकाणापासून परत येणार नाहीत. आंदोलनाला निघाल्यापासून परत येईपर्यंत कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील स्वतः कोणतीही भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत कोणीही कोणत्याही निष्कर्षाला येऊ नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चा करणार जेवणाची व्यवस्था

आंदोलनासाठी येणार्‍या बारामती तालुक्यातील सर्व समाजबांधवांच्या जेवणाची सर्व व्यवस्था ही मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासोबत आंदोलनासाठी जाणार्‍या समाजबांधवांसाठी वैद्यकीय प्रथमोपचार साहित्य सोबत घेण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button