‘कृषिक’ला शेतकर्‍यांची गर्दी; कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून पसंती | पुढारी

‘कृषिक’ला शेतकर्‍यांची गर्दी; कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून पसंती

बारामती : पुढारी वृत्तसेवा : अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषिक प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (दि. 18) कोकण, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांचीही अनेक शेतकर्‍यांनी आवर्जून भेट घेत शेतीतील बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कृषिक प्रदर्शनाला गुरुवारी भेट दिली.

या प्रदर्शनात ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा केलेला वापर शेतकर्‍यांना बघायला मिळाला. या नाविन्यपूर्ण विषयाबद्दल शेतकर्‍यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. जमिनीमध्ये सेन्सर तंत्रज्ञान कसे काम करते, त्याचा वापर कसा करावा, पिकांसाठी आवश्यक असलेले विविध घटक योग्य वेळेत, योग्य प्रमाणात, अचूकरीत्या कसे मिळतात, त्यासाठी येणारा खर्च याची शेतकर्‍यांनी बारकाईने माहिती घेतली. आमच्याकडे अल्प शेती आहे, आम्हाला हे तंत्रज्ञान परवडेल का, वापरता येईल का अशा अनेक शंकांचे निरसन केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून शेतकर्‍यांनी करून घेतले.

आपल्यासारखे छोटे शेतकरीही मोबाईलच्या आजच्या जगात हे तंत्रज्ञान वापरू शकतो, असा विश्वास शेतकर्‍यांनी व्यक्त केला. आमदार पवार यांनीही प्रक्षेत्रावर असलेले विविध तंत्रज्ञान जाणून घेतले. फार्म ऑफ फ्युचर – भविष्यातील शेती कशी असेल, हे पाहण्यासाठी कृषिकला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. तुर्कस्थान येथील तीन फुटी कणीस असलेली बाजरी, लाल केळी, ब्लू जावा केळी, ड्रोन, एआय मॉनिटर, फुल शेती याचीही शेतकर्‍यांनी पाहणी केली. जनावरांच्या प्रदर्शनामध्ये काजळी खिलार बैल आकर्षण ठरले. पुंगनूर गाय, कपिला खिलार, लाल खांदारी वळू, सहिवाल, देवणी गाय व काश्मिरी, आफ्रिकन शेळ्या पाहण्यासाठी शेतकर्‍यांची झुंबड होती. 22 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्राने केले आहे.

हेही वाचा

Back to top button