विजेच्या खांबामुळे दुर्घटनांची टांगती तलवार : सिंहगड रस्त्यावरील समस्या | पुढारी

विजेच्या खांबामुळे दुर्घटनांची टांगती तलवार : सिंहगड रस्त्यावरील समस्या

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : रुंदीकरण होऊनही उच्च दाबाच्या विजेचे धोकादायक खांब सिंहगड रस्त्यावर किरकटवाडी फाटा, नांदेड फाटा आदी वर्दळीच्या ठिकाणी उभे आहेत. यामुळे प्रवाशांसह स्थानिक रहिवाशांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे, तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणची एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू आहे.

रस्त्यातच खांब व लोंबकळत असलेल्या तारा व त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. त्यामुळे किरकटवाडी फाट्यासह नांदेड फाटा आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अपघाताची मालिका सुरू आहे. धोकादायक प्रवासामुळे पर्यटकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. धोकादायक खांब हटविण्यात यावेत; अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. खडकवासला मनसेचे उपाध्यक्ष रमेश करंजावणे म्हणाले, ’या भागात लोकसंख्या चार पटीने वाढली आहे. वाहतूकही प्रचंड प्रमाणात आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने भरधाव वेगाने धावणारी वाहने थेट खांबांना धडकून अपघात होत आहेत.

खांबामुळे वाहतुकीस अडथळा

पाच वर्षांपूर्वी हायब्रीड अम्युनिटी योजनेतून नांदेड ते पानशेत रस्त्यासह सिंहगड , गडकोट जोडणार्‍या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. पूल, तसेच काही अपवाद वगळता बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, रस्त्यांचे रुंदीकरण करताना वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब, वाहिन्या बाजूला काढून संरक्षित करण्यात येणार होत्या. मात्र प्रत्यक्षात धोकादायक खांब उभेच आहेत.

प्रस्तावित कामात रुंदीकरण करताना विजेचे खांब बाजूला काढण्यात येणार होते. रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने काम सोडले आहे. त्यामुळे सध्या तरी खांब बाजूला काढण्यासाठी बांधकाम विभागाचे नियोजन नाही.

-ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सिंहगड-पानशेत विभाग, सावर्जनिक बांधकाम विभाग

रस्त्याच्या रुंदीकरणामुळे खांब रस्त्यात आले आहेत. सर्व धोकादायक खांब हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला रितसर परवानगी दिली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने खांब बाजूला काढून सुरक्षित ठिकाणी उभे करणे आवश्यक आहे.

-सचिन आंबवले, शाखा अभियंता, सिंहगड महावितरण विभाग

हेही वाचा

Back to top button