आदर्श, संस्कृती व भक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रभू श्रीराम : अश्विनीकुमार चौबे | पुढारी

आदर्श, संस्कृती व भक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रभू श्रीराम : अश्विनीकुमार चौबे

 पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेची उत्सुकता केवळ देशवासीयांनाच नव्हे, तर जगभरातील राम भक्तांना आहे. प्रभू श्रीराम ही व्यक्ती नव्हे, तर आदर्श, संस्कृती आणि अखंड भारतवासीयांच्या मनामनात भक्तीचा त्रिवेणी संगम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले. राम मंदिरात रामलल्ला विराजमान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

याचे उद्घाटन गुरुवारी चौबे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पंकज महाराज गावडे, पुरुषोत्तम महाराज पाटील, चैतन्य महाराज कबीर, प्रदीप गारटकर, अप्पा रेणुसे, विजय जगताप आदी उपस्थित होते. बिट द अनबिटेबल डान्स ग्रुपने केलेल्या नृत्य सादरीकरणाने लक्ष वेधून घेतले.

अश्विनीकुमार चौबे म्हणाले, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत, हा क्षण देशवासीयांसाठी दीपोत्सवच आहे. सनातनी संस्कृती, हिंदू धर्मातील प्रत्येकजण अयोध्येत साकारलेले श्रीराम मंदिर पाहण्यासाठी उत्सुक आहे. लाखो कारसेवकांनी ’मंदिर वही बनायेंगे’चा नारा देत दिलेला लढा शेकडो वर्षांनी यशस्वी झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्यदिव्य मंदिर उभारण्यात घेतलेल्या पुढाकारामुळे हे स्वप्न साकार होत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले, तर मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा

Back to top button