बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी : आम्ही जगायचं कसं?; नागरीकांचा सवाल | पुढारी

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी : आम्ही जगायचं कसं?; नागरीकांचा सवाल

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : खोडद (ता.जुन्नर) येथे एका शेतकऱ्याच्या शेतावर मेंढरं घेऊन बसलेला सतीश दहाणू कोकरे (वय 20 ) या मेंढपाळावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला . या हल्ल्यात मेंढपाळ सतीश कोकरे जखमी झाला असून त्याच्यावर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सतीश कोकरे याच्या डोक्याला तीन ठिकाणी जखमा झाल्या आहेत. घटनेची वन विभागाला माहिती कळताच वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून सतीश कोकरे यांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हालवले आहे.

सतीश कोकरे यांच्या डोक्याला तीन ठिकाणी बिबट्याचा पंजा लागल्याने जखमा झाल्या आहेत वैद्यकीय उपचारानंतर त्याची प्रकृतीत सुधारणा आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, खोडद येथील दीपक मुळे यांच्या शेतामध्ये सतीश कोकरे यांचा मेंढरांचा वाडा आहे. रात्री वाडा व्यवस्थित लावल्यानंतर कुटुंबातील सगळे सदस्य झोपी गेले. दीड वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांचा जोरात भुंकण्याचा आवाज आला . कुत्र्याच्या भुंकण्यामुळे सतीश कोकरे जागा झाला. त्याने बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने सतिश कोकरेच्या डोक्याला पंजा मारला. यात सतीश कोकरे जखमी झाला असून त्याच्या डोक्याला तीन ठिकाणी जखमा झाल्या आहेत.

दरम्यान गेले काही दिवसापासून मानव व बिबट्या यांचा संघर्ष वाढत चालला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी शेतामध्ये पाणी भरायला सुद्धा जाताना घाबरत आहे .सोबतीला जोडीदार घेतल्याशिवाय शेतामध्ये पाणी भरता येत नाही. दोन दिवसांपूर्वी वारुवाडी येथील महिला सुनीता बनकर यांच्यावर देखील बिबट्याने हल्ला करायचा प्रयत्न केला होता परंतु त्यांनी बिबट्याचा हल्ला परतवून लावला होता. दरम्यान आम्हाला दररोज शेतकऱ्याच्या शेतावर मेंढरांचा वाडा लावावा लागतो आणि बिबट्याच्या हल्ले जर आमच्यावर असे होणार असतील तर आम्ही जगायचं कसं ? अशा प्रकारची भीती व्यक्त करून वन विभागाने गांभीर्याने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याचे हल्ले मानवावर वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाने याबाबत बिबट्यांना पकडण्यासाठी केवळ पिंजरे लावून उपयोग होणार नाही तर त्यांच्यावर नसबंदी करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी निलेश कानडे यांनी केली आहे.
कोट

मेंढपाळांनी रात्री झोपण्याच्या वेळेस जमिनीपासून जरा उंचीवर झोपावे. व स्वतःभोवती वाघूर लावून झोपावे.ज्या प्रमाणे मेंढरांना वाघूर लावून त्यात सुरक्षित ठेवतो, त्याचप्रमाणे मेंढपाळाने देखील स्वतःभोवती वाघूर लावून झोपावे जेणेकरून बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव होऊ शकतो.

वैभव काकडे, वनक्षेत्रपाल 

हेही वाचा

 

Back to top button