नवीन सहकार धोरणनिर्मितीत मेहता संस्थेची उत्तम भूमिका : दिलीप वळसे पाटील | पुढारी

नवीन सहकार धोरणनिर्मितीत मेहता संस्थेची उत्तम भूमिका : दिलीप वळसे पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारमार्फत आखण्यात आलेल्या नवीन सहकारी धोरणामध्ये सहकार चळवळ सशक्त बनवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे धोरण ठरविताना वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेने उत्तम भूमिका पार पाडली आहे, अशा शब्दांत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संस्थेचा गौरव केला. ‘वैमनीकॉम’सारखी संस्था सहकार क्षेत्रासाठी दीपस्तंभासारखी काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहसंस्थेच्या (वैमनीकॉम) 57 व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित समारंभात ते सोमवारी (दि.15) बोलत होते. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ (एनडीडीबी), आनंदचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पी. एम. दिघे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, वैमनीकॉमच्या संचालिका डॉ. हेमा यादव, वैमनीकॉमचे निबंधक आर. के. मेनन, सहप्राध्यापक यशवंत पाटील आदी उपस्थित होते. विविध अभ्यासक्रमांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी संस्थेच्या ’सहकार संदर्भ (को-ऑपरेटिव्ह पर्सपेक्टिव्ह)’ जर्नलचे प्रकाशनही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

‘सहकार से समृद्धी’अंतर्गत देशपातळीवर विविध संस्थांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कृषी पतसंस्थांना सी. एस. सी. केंद्र, पेट्रोल पंप, गॅस वितरण सेवा, जन औषधी केंद्र आदी वेगवेगळे 152 प्रकारचे उद्योग सुरू करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र यात देशपातळीवर अग्रेसर राहिलेला असून, देशातील सर्वांत मोठ्या सहकार विद्यापीठाची निर्मिती होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, ऊर्जाक्षेत्राबाबतही विद्यापीठामार्फत काम केले जात असून, जगात हायड्रोजन ऊर्जेचा वापर हरित ऊर्जा म्हणून यापुढे जास्त झाला पाहिजे. संचालक डॉ. हेमा यादव स्वागत केले. या वेळी डॉ. यशवंत पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

हेही वाचा

Back to top button