खोर : पुढारी वृत्तसेवा : कुणबी-मराठा अशी 1871 मधील नोंद वरंवड (ता. दौंड) येथील जन्म-मृत्यू रजिस्टर म्हणजेच गाव नमुना नंबर 14 सापडली आहे. राज्यातील ही पहिली कुणबी-मराठा नोंद असल्याचा दावा महाराष्ट्र शासन प्रमाणपत्रधारक मोडी लिप्यंतरकार कांचन कोठावळे यांनी केला आहे.
ब्रिटिश राजवटीत इंग्रजांचे रेल्वे प्रशासनाचे कार्यालय पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड गावात होते. एक ऐतिहासिक, दुर्मीळ नोंद मोडी लिपीतून मिळाली आहे. याबाबत माहिती देताना महाराष्ट्र शासन प्रमाणपत्रधारक मोडी लिप्यंतरकार कांचन कोठावळे म्हणाल्या की, प्रशासनाने माझ्याकडे दौंड तालुक्यातील मोडी लिपीतील कुणबी नोंदी शोधण्याबाबतीतील कार्यभार सोपविला होता. कुणबी नोंदींचे वाचन करून मिळालेल्या मराठा कुणबी नोंदीचा अहवाल दौंड तहसीलदार कार्यालयाकडून पुढे पाठविला जाणार आहे.
आजपर्यंत दौंडमधून 17 हजार 594 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. याचवेळी दौंड तालुक्यातील वरवंड गाव नमुना नंबर 14 या मधील पहिली नोंद सन 1871 मधील मराठे कुणबी नोंद सापडली आहे. एप्रिल 1871 कुसाबाई कोम पा. दिहेकर-कुणबी मराठे ही नोंद आढळून आली आहे. हा शब्द मध्ययुगीन कालखंडात वापरला जात असे. राज्यातील हा अस्सल महसूल पुरावा आहे. ब्रिटीश सरकारने इ. स. 1871 साली खानेसुमारी (जगगणना) ब्रिटीश हाईसराय लार्ड मेथी यांच्या आधिपत्याखाली केली होती.
त्यासंदर्भाने तत्कालीन जन्म-मृत्यू रजिस्टर सन 1871 ची ही नोंद मर्हाठे कुणबी अशी पहिल्या जणगणनेतील नोंद मराठे हेच कुणबी यादृष्टीने एकच आहे, हे सिद्ध होते. महाराष्ट्रात त्याचप्रमाणे मराठा-कु (कुणबी, मराठा-कुण) अशा देखील खूप नोंदी सापडल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठा कुणबी आहेत, याबाबतचा हैदराबाद राज्याच्या गॅझेटमधून ही नोंद मोडी लिपीवाचक महाराष्ट्र शासन प्रमाणपत्रधारक कांचन अभय कोठावळे (पुणे) यांनी प्रमाणित केली आहे.
राज्यातील सर्व मराठा कुणबी आहेत. याबाबत हैदराबाद राज्याच्या गॅझेटमधून 1909 आणि उच्च न्यायालयाच्या सन 1991 चा निर्णय व 1997 मध्ये जातपडताळणी समिती यांनी याबाबत निर्णय दिला होता. दौंड तालुक्यातील वरवंड येथील ही नोंद मराठा आरक्षणासाठी एक महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे. शासनाने मराठा आरक्षणाचा विचार या नोंदणीनुसार ग्राह्य धरावा व ही सापडलेली नोंद मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे देखील पाठवली असल्याचे कांचन कोठावळे यांनी सांगितले.
हेही वाचा