अयोध्येतील कार्यक्रम कुणा पक्षाचा नाही : खासदार सुजय विखे | पुढारी

अयोध्येतील कार्यक्रम कुणा पक्षाचा नाही : खासदार सुजय विखे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : विकासकामे कितीही केली, तरी प्रश्न नव्याने निर्माण होतच असतात. अयोध्येत 22 जानेवारीला होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा कोणत्या पक्षाचा किंवा चिन्हाचा नाही. त्यामुळे तो प्रत्येकाने आंतर्मनाने साजरा करावा. शहरातील प्रत्येक प्रभागात आम्ही स्पर्धा घेणार असून, विजेत्या कुटुंबातील दोन सदस्यांना आमच्या खर्चाने अयोध्या दर्शनासाठी घेऊन जाणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी जाहीर केले.

पाथर्डी शहरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन भगवान नगर, नवी पेठ, कसबा पेठ खोलेश्वर मंदिर व हंडाळवाडी येथे खासदार विखे व आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, सुभाष बर्डे, अमोल गर्जे, अ‍ॅड प्रतीक खेडकर, रमेश गोरे, प्रवीण राजगुरू, मुकुंद लोहिया, बजरंग घोडके, सुरेखा गोरे, बंडू बोरुडे, महेश बोरुडे, मंगल कोकाटे, विष्णुपंत अकोलकर, अजय भंडारी, अशोक मंत्री, संजय बडे, सुनील ओव्हाळ, बबन बुचकूल, सिंधू साठे, ज्योती मंत्री, अजय रक्ताटे आदी उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, खासदार विखे यांच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रूपयाचा निधी आपण आणला आहे. त्यामुळे या कामांना चालना मिळाली आहे. कोरोना काळातही खासदार विखे यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला. प्रास्ताविक डॉ मृत्युंजय गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतीक खेडकर यांनी केले. रमेश गोरे यांनी आभार मानले.

रमेश गोरे यांचा विखेंना चिमटा

माजी नगरसेवक रमेश गोरे यांनी खासदार विखे यांना चिमटा काढत त्याची चांगलीच पंचायत केली. स्व. राजीव राजळे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या मदतीमुळे कसबा परिसराचा चेहरामोहरा बदलला. खा. विखे यांनी केलेली मदत मात्र कमी आहे. ते अभय आव्हाड यांना जास्त मदत करतात, मला कमी मदत करतात, आपणही त्यांना मते दिली आहेत, असे गोरे म्हणताच उपस्थितांत एकच हशा पिकला.

मिश्किल टिप्पणी अन् हशा

प्रसाद म्हणून लाडूचा नैवेद्य आम्ही दिलेल्या साखर आणि डाळीतून प्रत्येकाने तयार करायचा आहे. तुपासाठी आमदार मोनिका राजळे यांचे घर तुम्हाला माहितीच आहे, अशी मिश्किल टिप्पणी खासदार विखे यांनी करताच उपस्थित महिलांमध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा

Back to top button