राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत धक्काबुक्की; कोनशिलेवर सुप्रिया सुळेंचे नाव नसल्याने राडा | पुढारी

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत धक्काबुक्की; कोनशिलेवर सुप्रिया सुळेंचे नाव नसल्याने राडा

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापुरात शासकीय विश्रामगृहाच्या भूमिपूजनाच्या कोनशिलेवर खा. सुप्रिया सुळे यांचे नाव नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट व धक्काबुक्की होऊन वातावरण तापले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून ते शांत केले. शरद पवार गट प्रथमच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या वेळी या गटाकडून जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध नोंदविला.

शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडणार होता. त्या कोनशिलेवर खा. सुळे यांचे नाव नसल्याने सुळे यांचे समर्थक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले होते.

निवेदन दिल्यानंतर तत्काळ कोनशिलेवर सुळे यांचे नाव टाकावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी घरला व उपकार्यकारी अभियंता दीपक भोसले यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करीत ठिय्या मांडला. या वेळी शरद पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, सागर मिसाळ, समद सय्यद, छाया पडसळकर, बाळासाहेब चितळकर, अरबाज शेख, विकास खिलारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, भूमिपूजन कार्यक्रमासाठी आ. भरणे आल्यानंतर चांगलीच घोषणाबाजी झाली. दोन्ही गटांत राडा झाला. तणावपूर्ण वातावरणातच आ. भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या ठिकाणी भूमिपूजन केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह व कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव टाकणे आवश्यक असताना देखील जाणीवपूर्वक टाकले गेले नाही. इंदापूर तालुक्यात अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधी दडपशाही सुरू आहे. आम्ही ती कदापीही खपवून घेणार नाही.

महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

अधिकारी म्हणतात : हा खासगी कार्यक्रम शरद पवार गटाचे कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता दीपक भोसले यांना निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव टाकावे, अशी मागणी केली. मात्र, हा खासगी कार्यक्रम असल्याचे उपकार्यकारी “अभियंता भोसले यांनी उद्धटपणे सांगितल्याने कार्यकर्ते भडकले व घोषणाबाजी सुरू केली. सामोपचाराने मार्ग निघाला असता. मात्र, अधिकाऱ्याच्या उद्धटपणामुळे गोंधळ वाढल्याचे या वेळी दिसून आले.

घाईगडबडीत सुप्रिया सुळे यांचे नाव राहून गेले. यात अधिकार्‍यांची चूक नाही. पालकमंत्री अजित पवार यांचे देखील नाव राहिले आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची नावे टाकून दुरुस्ती केली जाईल, त्यामुळे यात राजकारण करू नये.

दत्तात्रय भरणे, माजी मंत्री, आमदार इंदापूर

हेही वाचा

Back to top button