Pune : अंगणवाडी सेविका संपावर ठाम | पुढारी

Pune : अंगणवाडी सेविका संपावर ठाम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक बालविकास सेवायोजनेमधील सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. गेल्या चाळीस दिवसांनंतर अंगणवाडी सेविका संपावर ठाम आहेत. तर, प्रशासनाकडून काही प्रमुख मागण्यांच्या पूर्तता केल्याने मंगळवारपर्यंत सर्व अंगणवाडी सेविका कामावर हजर होतील, असे सांगण्यात येत आहे. मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर अंगणवाडी केंद्रात करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात श्रेणीवर्धन करण्यास आणि त्यासाठी केंद्र व राज्य हिश्याखाली येणार्‍या खर्चाला मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्य शासनाने सर्व मिनी अंगणवाडीचे रूपांतर अंगणवाडीमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाने प्रसिद्ध केला.

या निर्णयानुसार अंगणवाडीत मदतनिसांची पदे निर्माण होणार असून, ही पदे नियमानुसार भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. तसेच, 25 अंगणवाडी केंद्रासाठी 1 मुख्यसेविका अथवा पर्यवेक्षिका याप्रमाणे एकूण 520 पदे निर्माण करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, मदतनिसांना साडी अथवा गणवेश, फर्निचर आणि प्रशासकीय खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रमुख मागण्यांपैकी मोबाईल फोन पुरविणे व मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करणे. या मागण्यांची पूर्तता झाल्याने मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी सेविका व मदतनीस कामावर हजर झाल्या आहेत. 16 जानेवारीपर्यंत 100 टक्के अंगणवाडी सेविका व मदतनीस या कामावर हजर होतील.
                             – जे. बी. गिरासे, महिला व बालविकास अधिकारी, जि. प.

 

मानधनवाढीची आमची प्रमुख मागणी आहे. त्याकडे दुर्लक्ष करून सरकारकडून जुन्या गोष्टीच पुढे केल्या जात आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच राहणार आहे.
                                                – रजनी पिसाळ, जिल्हा सचिव, कृती समिती

Back to top button