ससून ड्रग प्रकरण : डॉ. संजीव ठाकूर यांचे पाय खोलात | पुढारी

ससून ड्रग प्रकरण : डॉ. संजीव ठाकूर यांचे पाय खोलात

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ड्रगतस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याविरुध्द पुणे पोलिसांना ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे डॉ. ठाकूर यांच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सक्षम प्राधिकरण अधिकार्‍याकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे आता डॉ. ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यावर ससून प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले. ललित पाटीलवर डॉ. ठाकूर यांच्या युनिटतर्फेच उपचार सुरू होते. पाटीलकडून त्यांना आर्थिक मदत पोहचवली जात होती.

त्याला ससूनच्या कैदी वॉर्डमध्ये जाणीवपूर्वक डॉ. ठाकूर यांनी आश्रय दिल्याचेही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे नेमलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात डॉ. संजीव ठाकूर दोषी आढळून आले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. ठाकूर यांना पदमुक्त केले. ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेले अस्थिरोग विभागातील डॉ. प्रवीण देवकाते यांचे तातडीने निलंबन करण्यात आले आणि त्यांना अटकही करण्यात आली. मात्र, डॉ. ठाकूर यांच्यावर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे शासन त्यांना वाचवत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

मागील आठवड्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी डॉ. संजीव ठाकूर यांच्या विभागीय चौकशीला मान्यता देण्यात आल्याची माहिती दिली. चार्जशीट दाखल झाल्यावर विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातील इन्क्वायरी ऑफिसरमार्फत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. आता पोलिसांना परवानगी मिळाल्यावर तातडीने दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यामुळे डॉ. ठाकूर यांचे पाय आणखी खोलात जाणार असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button