स्वच्छ सर्वेक्षण 2023 : लोणावळ्याला सलग सहाव्या वर्षी मिळाला पुरस्कार | पुढारी

स्वच्छ सर्वेक्षण 2023 : लोणावळ्याला सलग सहाव्या वर्षी मिळाला पुरस्कार

लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत लोणावळा नगर परिषदेने सलग सहाव्या वर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत पुरस्काराचा षटकार मारत दिल्लीत आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. मागील वर्षी देशात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात सर्वांत स्वच्छ शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर राहण्याचा मिळवलेला मान कायम ठेवला होता. तसेच, लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात देशात तृतीय क्रमांक प्राप्त करत राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित होण्याचा बहुमान मिळविला होता.

नुकत्याच पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेत संपूर्ण भारत देशात लोणावळा शहरास 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेलला तृतीय क्रमांक, तर 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या गटात लोणावळा नगर परिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यासोबतच या स्पर्धेत सातत्य राखत सलग सहाव्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर आपले नामांकन टिकवून ठेवत लोणावळा नगर परिषदेने पुरस्काराचा षटकार मारत दिल्लीत आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

कचरामुक्त शहर श्रेणीमध्ये 3 स्टार रेटिंग

पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या उपस्थितीत लोणावळा नगर परिषदेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोणावळ्याचे तत्कालीन मुख्याधिकारी पंडित पाटील, विद्यमान मुख्याधिकारी अशोक साबळे, सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास, शहर समन्वयक अक्षय पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कार स्वीकारला. याशिवाय लोणावळा शहरास कचरामुक्त शहर या श्रेणीमध्ये 3 स्टार रेटिंग व वॅाटर प्लसदेखील प्राप्त झाले आहे.

लोणावळेकरांनी व्यक्त केला आनंद

लोणावळा नगर परिषदेने सलग सहाव्या वर्षी हा पुरस्कार मिळविल्याने याचा आनंद लोणावळेकर सोशल मीडियावर मोठ्या उत्साहात व्यक्त करीत आहेत. तसेच, हे नेत्रदीपक यश मिळविण्यात नगर परिषदेचे कर्मचारी व नागरिकांच्या सांघिक कामगिरीचा महत्त्वाचा वाटा आहे. नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांचे तत्कालीन मुख्याधिकारी पंडित पाटील व विद्यमान मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button