मराठा समाज आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात | पुढारी

मराठा समाज आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लासूरस्टेशन, पुढारी वृत्तसेवा ः गंगापूर तालुक्यातील आरापूर शिवारात गंगापूर उपसा जलसिंचन योजनेच्या भूमिपूजनाला येणार्‍या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोध करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी गंगापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. गुरुवारी सकाळपासून शिल्लेगाव, गंगापूर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले होते. गंगापूर ब्रह्मगव्हाण उपसा जल सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये महेश गुजर,भाऊसाहेब शेळके, राहुल ढोले, नितीन कांजूने, संदीप शेळके, दादासाहेब जगताप, सुभाष भोसले राहुल सुरासे,किरण वालतुरे,बाळासाहेब सोमासे यांचा समावेश आहे.

शेतकर्‍यांना पाणी मिळावे म्हणून सुरू होत असलेल्या योजनेला आमचा विरोध नाही. शेतकर्‍यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करावे. मराठा समाजाचा ओबीसीमधून आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना सरकारमधील कुठल्याही मंत्र्याने येऊन विकासकामांच्या उद्घाटनाच्या नावाखाली तालुक्यातील सामाजिक वातावरण खराब करू नये, अशी मराठा आंदोलकांची भूमिका होती त्यामुळे मराठा आंदोलकांना पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून ताब्यात घेतले होते.

Back to top button