चाराच नाही तर जनावरे जगवायची कशी? शेतकरी हतबल

चाराच नाही तर जनावरे जगवायची कशी? शेतकरी हतबल
Published on
Updated on

निरा : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर तालुक्याच्या बहुतांश भागात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या चार्‍याची टंचाई भासू लागली आहे. अनेक गावांत तसेच वाड्या-वस्त्यांवर आत्तापासूनच पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत जनावरे जगवायची कशी? अशी चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यातील अनेक गावांत अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे काही दिवसांपासून पाण्याची कमतरता भासू लागली आहे. तर दुसरीकडे शेतातील जनावरांच्या हिरव्या चार्‍याचा देखील तुटवडा होऊ लागला आहे.

गावांत जनावरांचा चार्‍याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. काही गावांत, वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पुढील काही दिवसांतच भीषण पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. याचा मोठा फटका दुग्ध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी तालुक्यात जनावरांच्या हिरव्या चार्‍याचा तुटवडा आहे. हिरवा चारा म्हणून अनेकजण ऊसाचे वाढे वापरत आहेत. काही शेतकर्‍यांना दुसर्‍या तालुक्यातून चारा आणावा लागत आहे. मात्र ज्यांच्याकडे चारा आहे त्या चार्‍याचे भाव गगनाला भिडले आहेत. पुढील काही दिवसांत पाणी आणि चार्‍याच्या टंचाईने पशुधन वाचवायचे कसे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. शासनाने त्वरीत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

शासनाने पुरंदर तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा. चाराच उपलब्ध झाला नाही तर पुढील काही दिवसांतच पशुधनाचे खूप हाल होतील. पर्यायाने शेतकर्‍यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
                                                            – कांचन निगडे, गुळूंचे, ता. पुरंदर

चार्‍याचे दर वाढले
चार्‍याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने, पशुपालकांचे अर्थकारणच कोलमडले आहे. उसाचा दर 4 ते साडेचार हजार रुपये टन, कडबा शेकडा 5 हजार रुपये, घास शेकडा दर 500 रुपये, तर हिरवी मका 4 हजार रुपये असा दर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news