राज्यातील पहिले अमृतवन उद्यान राजगुरुनगरला

राज्यातील पहिले अमृतवन उद्यान राजगुरुनगरला

शिवनेरी : राजगुरुनगर परिसरात दिवसेंदिवस वाढते शहरीकरण लक्षात घेऊन नागरिकांना मोकळ्या व स्वच्छ हवेत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता यावा म्हणून वन विभागाने पुढाकार घेतला आहे. राजगुरुनगर शहरालगत शिरोली येथे तब्बल 4 एकरांवर 300 हून अधिक वृक्ष, वेली, गवत, कॅक्टस, वनौषधीने समृध्द असे हुतात्मा राजगुरू अमृतवन उद्यान साकारले आहे. यामध्ये नागरिकांना सकाळ, सायंकाळी अनवाणी चालण्यासाठी खास पंचकर्म मार्गही बनविण्यात आला आहे. याशिवाय लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना निवांत बसण्यासाठी नैसर्गिक पॅगोडा, पंचवटी कुटी, निरीक्षण मनोरा उभारण्यात आला आहे.

खेड वन विभागाच्या वतीने राजगुरुनगर शहरालगत असलेल्या शिरोली येथील वन विभागाच्या जागेत 4 एकरांवर हे हुतात्मा राजगुरू अमृतवन उद्यान विकसित केले आहे. जुलै महिन्यात वनमंत्र्यांच्या हस्ते या अमृतवन उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या उद्यानामध्ये तब्बल 300 हून अधिक विविध प्रकारची वृक्षे लावण्यात आली आहेत. यात वनस्पतींच्या प्रकारानुसार वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. यात औषधीवन, पक्षिवन, दशमूळवन, गणेशबन, घनवन (मियावाकी) विभाग करण्यात आले आहेत.
या अमृतवन उद्यानामध्ये अनेक दुर्मीक प्रजातीसुद्धा लावण्यात आल्या आहेत. यात कापूर, रुद्राक्ष, धूप, गोरखचिंच, नागकेशर, रक्तगुंज, सोमवल्ली, अजानवृक्ष, रक्तचंदनासह औषधीवनमध्ये 165 प्रकारच्या प्रजाती, फळझाडांचे 25-30 प्रकार, हळदीचे 5-6 प्रकार, चाफ्याचे 9 प्रकार आणि विशेष म्हणजे कॅक्टसचे अनेक दुर्मीळ प्रकार येथे पाहायला मिळणार आहेत.

मियावाकी घनवनामध्ये 6 गुंठ्यांत शेकडो वृक्ष, वेली, फुलझाडे लावण्यात आली आहेत. मधमाश्यांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी अनवाणी चालण्यासाठी शास्त्रीय पध्दतीने पंचकर्म मार्ग करण्यात आला आहे. या मार्गावर दोन्ही बाजूने सुगंधी फुलांच्या वेली लावण्यात आल्या आहेत. शिरोली येथील वन विभागाच्या ओसाड माळरानावर 6 महिन्यांतच सुंदर असे उद्यान फुलविले आहे. भविष्यात हे अमृतवन उद्यान राजगुरुनगर शहर आणि परिसरातील लोकांसाठी फार मोठे वरदान ठरू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news