पुणे : पुढारी वृत्तसेवा : बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणार्या अधिछात्रवृत्तीसाठीच्या चाळणी परीक्षेत बुधवारी पुन्हा गोंधळ झाला आहे. पेपरफुटीचा आरोप करत काही केंद्रांवर परीक्षार्थ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. दरम्यान, परीक्षा घेणार्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून पेपरफुटीचा आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणार्या अधिछात्रवृत्तीसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत 2019 मध्ये झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना देण्यात आली. मात्र, त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बैठक घेऊन फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी परीक्षा आयोजित करण्यात आली.
राज्यभरातील छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पुण्याच्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रश्नपत्रिकांना सील नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकून संताप व्यक्त केला. अशा काही केंद्रांवर चाळणी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांना सीलच नसल्याचा आरोप परीक्षार्थ्यांकडून करण्यात आला. प्रश्नपत्रिकांचे ए आणि बी संच सीलबंद होते, तर सी आणि डी संच मात्र सीलबंद नव्हते. त्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या छायाप्रती काढून वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच परीक्षा केंद्रांवर घोषणाबाजी आणि आंदोलन करण्यात आले. राज्यातील पाच शहरांमध्ये एकूण 3 हजार 475 संशोधक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक प्रा. बी. बी. कापडणीस यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले. 'सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे पीएच.डी. अधिछात्रवृत्ती संयुक्त चाळणी परीक्षा पुणे, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या शहरातील परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली. या परीक्षेसाठी ए, बी, सी आणि डी अशा चार प्रश्नपत्रिका संचाची छपाई दोन मुद्रणालयांकडून गोपनीयरित्या, सर्व सुरक्षा मानकांचे करून घेण्यात आली होती. त्यामुळे छपाईच्या स्वरुपामध्ये बदल
असू शकतो. प्रश्नपत्रिका संच परीक्षा केंद्रांवर सीलबंद स्वरुपात पोहोचवण्यात आले होते. संपूर्ण परीक्षाप्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रांवर पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. त्यामुळे परीक्षेच्या पेपरफुटीबाबत केलेले आरोप पूर्णत: निराधार आहेत, त्यात तथ्य नाही,' असे नमूद करण्यात आले.
'सारथी', 'महाज्योती' आणि 'बार्टी'कडून एकदा निवड झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना पुढील सलग पाच वर्षे दरमहा छात्रवृत्ती आणि 'एचआरए' भत्ता दिला जातो. याशिवाय वर्षातून एकदा आकस्मिकता खर्च म्हणूनही काही रक्कम देण्यात येते. सर्वांची गोळाबेरीज केल्यास संशोधक विद्यार्थ्यांना दरमहा सरासरी 42 हजार रुपये एवढी रक्कम मिळते.
हेही वाचा