Pune : मेट्रो मार्गिकेमुळे बीआरटी शक्य नाही | पुढारी

Pune : मेट्रो मार्गिकेमुळे बीआरटी शक्य नाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 62 मीटर रुंद असणारा रस्ता पुणे महापालिकेत 42 मीटर होतो. त्यातच मेट्रो मार्गिकेमुळे चार लेनचा रस्ता तीन लेनचा झाला आहे. त्यामुळे अंडी उबवणी केंद्र ते संत तुकाराम महाराज पूल (हॅरिस बि—ज) यादरम्यान बीआरटी मार्ग शक्य नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे. महापालिका हद्दीत खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस बि—ज) च्या 2.1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण आठ वर्षे भूसंपादनाच्या अडचणीमुळे झाले नव्हते. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने 2016 मध्ये निविदा काढली होती. मात्र, रस्त्यासाठी जागाच ताब्यात नसल्याने काम होऊ शकले नव्हते.

मात्र, लष्कराने ही जागा महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने हा रस्ता 42 मीटर रुंद करण्याचे काम हाती घेतले आहे. आत्तापर्यंत 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, रस्तारुंदीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर प्रस्तावित असलेली बीआरटी न करता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पीएमपीएमएलसाठी स्वतंत्र मार्गिका करण्यात येत आहे. यासंदर्भात दैनिक ’पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने या मागील भूमिका स्पष्ट केली आहे.

सध्या ज्या पॅचचे काम सुरू आहे, त्याच्या दोन्ही बाजूंना बीआरटी नाही. संत तुकाराम महाराज पुलावरही बीआरटी नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामात बीआरटी व बीआरटी थांबे प्रस्तावित नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मिलिटरीच्या भिंती आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची संख्या प्रतिदिन दोन लाख आहे. रस्त्याच्या परिसरात मानवी वस्ती नाही. या रस्त्याला मेट्रो मार्गिका आडवी गेल्यामुळे चार लेन असलेला रस्ता तीन लेनचा झाला आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग करणे शक्य नाही. याबाबत वाहतूक पोलिस, आरटीओ आणि पीएमपीएमएलशी चर्चा करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पीएमपीएमएलसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे पीएमपीएमएलच्या प्रवाशांना रस्ता ओलांडून बस पकडण्याची गरज पडणार नाही, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

Back to top button