Pune : चाराटंचाईने वाल्ह्यातील पशुधन संकटात | पुढारी

Pune : चाराटंचाईने वाल्ह्यातील पशुधन संकटात

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या अभावी पशुधनास हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील पशुधन संकटात आले आहे. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत हिरव्या चार्‍याचा तुटवडा जाणवत आहे. हिरवा चारा म्हणून अनेकजण ऊसवाढे वापरत आहेत. तालुक्यातील अनेक गावांत पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही. तालुक्यातील अनेक गावांतील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

शेतीला पाणी मिळणेच कठीण असल्याने हिरवा चारा उपलब्ध होण्याची शक्यता मावळली आहे. पशुधन वाचवायचे असेल तर शासनाने इतर तालुक्यांतून हिरवा चारा आणून येथील पशुपालकांना द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पाण्याबरोबर जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्यांच्याकडे चारा आहे त्यांनी चार्‍याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढविले आहेत. पावसाअभावी यंदा खरीप, रब्बी हंगामात चारापिकांचे उत्पादन झाले नाही. डोंगर परिसरात थोड्या प्रमाणात जनावरांना चरण्यासाठी चारा उपलब्ध झाला होता. मात्र, मागील दोन-तीन महिन्यांपासून हा चारा देखील करपून गेला आहे. त्यामुळे पशुधन संकटात आले आहे. चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दुग्धव्यवसाय टिकविण्यासाठी शेतकर्‍यांना इतर ठिकाणांहून हिरवा चारा विकत आणावा लागत आहे. चार्‍याचे भाव वाढले असून, उसाचा भाव चार ते साडेचार हजार रुपये टन, कडबा 5 हजार रुपये शेकडा, घास शेकडा दर पाचशे, हिरवा मका 4 हजार रुपये असा आहे. चार्‍याचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने पशुपालकांचे अर्थकारणच कोलमडण्याची शक्यता आहे.

‘या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक भागांत चार्‍यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या वर्षाचा चारा संपला आहे. त्यामुळे विकत चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहेत. पुढील काही दिवसांत जनावरे जगवावी कशी? याचीच चिंता आहे.’
                                                                          – पोपट पवार, वाल्हे

शासनाने जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून पुरंदर तालुक्यातील पशुधन वाचवावे; अन्यथा पुढील काही दिवसांतच पशुपालक जनावरे विक्रीसाठी काढतील.
                                                           – नारायण पवार, सुकलवाडी, वाल्हे

Back to top button