..ही तर दुसरी सिंधूताई : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद | पुढारी

..ही तर दुसरी सिंधूताई : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आई-बाबांचे छत्र जाताच माझा ताबा काकांकडे गेला. पण, ते व्यसनाच्या आहारी गेले. त्यामुळे त्यांनी मला रस्त्यावरच सोडून दिले. पण, जनसेवा फाउंडेशनने मला नवे जीवन दिले. हे सांगताना तिला रडू आले. तिच्या हुंदक्यांनी भावुक झालेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, तुझी कहाणी सिंधूताई सपकाळ यांच्यासारखीच आहे. मला महाराष्ट्रात पुन्हा दुसरी सिंधूताई दिसली. जनसेवा फाउंडेशनतर्फे भिलारेवाडीत उभारलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.

या वेळी आपले मत मांडण्यासाठी दहावीत शिकणारी सृष्टी निकुंभ ही लहान मुलगी उभी राहिली. अस्खलित इंग्रजीत तिने स्वतःचा परिचय दिला. आपली कहाणी सांगताना तिला रडू कोसळले. हुंदके आवरेना म्हणून ती कोविंद यांच्या जवळ डोळे पुसतच गेली. नमस्कार केला अन् व्यासपीठावरून पायउतार झाली. हाच धागा पकडत कोविंद यांनी भाषणाला सुरुवात केली. भावुक स्वरात ते म्हणाले,  मी कालच सिंधूताईंच्या गावी गेलो होतो. त्यांची आणि या सृष्टीची कहाणी सारखी आहे. मला दुसरी सिंधूताई आज हिच्या रूपातच दिसली.
कोविंद म्हणाले, सामाजिक काम करताना समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून ते काम केल्यास ते अधिक जोमाने वाढते. प्रत्येकाने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवणे आवश्यक आहे.

आपण कधी कुणाला दुखावले तर पुढे कुठेतरी त्याचा मोबदला चुकवावाच लागतो. हा सृष्टीचा नियम आहे. जनसेवा फाउंडेशनने हजारो अनाथ मुला-मुलींच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. समाजातील अशाच सक्षम व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन वंंचित, बेघर आणि मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी पुढे येण्याची गरज आहे. या वेळी व्यासपीठावर बजाज फिनसर्व्हच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षा शेफाली बजाज, अश्विनी मल्होत्रा, जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई, राजेश शहा, संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा, मीना शहा यांची प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती देशपांडे
यांनी केले.

हेही वाचा

Back to top button