शरद मोहोळ खून प्रकरण : शरण येण्यासाठी पीएसआय हर्षल कदम यांना संपर्क | पुढारी

शरद मोहोळ खून प्रकरण : शरण येण्यासाठी पीएसआय हर्षल कदम यांना संपर्क

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड शरद मोहोळचा खून केल्यानंतर आरोपींनी त्यांचे वकील असलेले अ‍ॅड. उडान यांना संपर्क केला. मी आणि उडानसोबत काम करत असल्याने त्यांनी मला संपर्क करत गुन्ह्याची माहिती देऊन आरोपींना शरण यायचे असल्याचे सांगितले. न्यायालयातील कामकाज संपवून मी उडान यांना भेटलो. यावेळी पूर्वी कोथरूड पोलिस ठाण्यात आणि आता मुंबईत कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक हर्षल कदम यांना फोन करून आरोपीना शरण यायचे असल्याचे सांगितले. हर्षल कदम यांनी तुम्ही मुलांशी बोला आणि शरण व्हायला सांगा, असे सांगितल्याचा दावा अ‍ॅड. रवींद्र पवार यांनी न्यायालयात केला.

या प्रकरणात अ‍ॅड. रवींद्र वसंतराव पवार (वय 40, रा. नांदेगाव, ता. मुळशी), अ‍ॅड. संजय रामभाऊ उडान (वय 43, रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. पवार यांनी ही माहिती न्यायालयाला दिली. दरम्यान, आरोपींना सातारा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर भेटलो. यावेळी आरोपींना त्यांचे काही नातेवाईक येऊन भेटले. आरोपींनी शरण जाण्याची तयारी दर्शवली. मागावर पोलिस असतील. त्यामुळे आरोपी सोबत प्रवास केला. तसेच, या आरोपींना शरण कसे जायचे याबाबत सांगितले. मात्र, तेवढ्यात पोलिस आले आणि आम्हाला ताब्यात घेतले.

तपासी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी न्यायालयात सांगितले की, 15 डिसेंबर 2023 रोजी शरद मोहोळ खून प्रकरणातील सहा आरोपी हे एकत्र भेटले होते. या भेटीनंतर आरोपीने वकील रवींद्र पवार याला फोन केला होता. 5 जानेवारी रोजी मुन्ना पोळेकर आणि त्याचे सहकारी हे सातारा रस्त्याने पळून जात होते. यादरम्यान रवींद्र पवार आणि संजय उडान हे त्यांना खेड शिवापूर टोल नाक्यासमोर जाऊन भेटले.

यावेळी या दोन्ही वकिलांनी आरोपींसोबत 15 किलोमीटरचा एक ते दीड तास प्रवास केला. सातारा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर सगळे आरोपी थांबले होते. त्यावेळी या आरोपींना भेटायला त्यांचे नातेवाईक आले. यातील एका नातेवाईकाने आरोपींना एक नवीन सीमकार्ड दिले. हे सगळे आरोपी वकिलांसमोर बसले होते. आरोपी आणि अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. संजय उडान या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पंचासमोर आरोपींकडून शस्त्र, रोख रक्कम हस्तगत केली असल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाने सरकार पक्षासह बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत दोघांच्या पोलिस कोठडीत 11 जानेवारीपर्यंत वाढ केली.

शरण यायचे होते तर सीमकार्ड का बदलले?

याप्रकरणाचा तपास प्रगतिपथावर आहे. मोहोळचा खून केल्यानंतर आरोपींनी पवार आणि उडान यांच्याशी संपर्क साधला होता. आरोपींना शरण यायचे होते तर त्यांनी सीमकार्ड का बदलले. तसेच, पुण्याच्या विरुध्द दिशेने ते का प्रवास करत होते, या प्रश्नांसह अ‍ॅड. पवार व अ‍ॅड. उडान हे आरोपींना नेमके कोठे घेऊन जाणार होते, त्यांने कोठे लपवून ठेवणार होते, याचा सखोल तपास करायचा असल्याने सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. नीलिमा इथापे- यादव यांनी आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

यापूर्वी चारवेळा घेतले आरोपींचे वकीलपत्र

शरद मोहोळचा खून झाला तेव्हा अ‍ॅड. पवार व अ‍ॅड. उडान हे उपस्थित नव्हते. आरोपी हे पवार आणि उडान यांचे क्लायंट होते. पवार आणि उडान या वकिलांनी आरोपींचे चारवेळा वकीलपत्र घेतले आहे. यामुळे पवार आणि उडानवर भारतीय दंड विधान 302 सारखे कलम लागू होत नाही. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. एन. डी. पाटील यांनी केली.

शरद मोहोळसारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यासोबत कायम : नितेश राणे

शरद मोहोळने कायम हिंदुत्ववादासाठी काम केले. मोहोळ कुटुंबीयांसोबत आम्ही कायम आहोत, असे भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे. मोहोळ खून प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे राणे यांनी नमूद केले. राणे यांनी सोमवारी मोहोळ कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी, पत्नी स्वाती मोहोळ यांचे सांत्वन केले. मोहोळने हिंदुत्ववादासाठी काम केले. सामान्यांच्या अडचणी सोडवल्या. मूळ कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे काम आहे, असे राणे यांनी म्हटले आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांनीही चुकीच्या बातम्या देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button