

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मी कुठूनही लोकसभा निवडणूक लढवेल, मला मतदारसंघाची चिंता नाही. अकोला लोकसभा मतदारसंघाचा बाऊ करू नका, कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट करा, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना खडसावले. भीमा कोरेगावप्रकरणी आयोगात साक्ष नोंदवली. त्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर पुण्यात माध्यमांशी बोलत होते. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक असून प्रकाश आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे.
त्यांनी अकोल्यातून निवडणूक लढवावी, असे राऊत यांनी सांगितले. त्यावर बोलताना अॅड. आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, माझी या पक्षांना ऑफर आहे. मी लढलो काय आणि नाही लढलो, हे महत्त्वाचे नाही. ज्यांना अकोल्यातून निवडणूक लढायची आहे, त्यांनी लढावे. त्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे ताकद लावू. परंतु जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे, तो तरी बाहेर पडू द्या. शिवसेनेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ज्या काही वाटाघाटी झाल्या आहेत, त्या स्पष्ट करा. शिवसेनेची या दोन्ही पक्षांबरोबर आघाडी झाली नाही, तर शिवसेना आणि वंचित प्रत्येकी 24 जागा लढवू, असे आंबेडकर म्हणाले.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे मला निमंत्रण देणार असल्याचे मी वाचले आहे, परंतु मला अजूनही निमंत्रण मिळालेले नाही. मी त्याचीच वाट बघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिवशी दिवाळी साजरी करा, त्यांनी आतापर्यंत जे काही सांगितले आहे, ते आपण ऐकलं आहे. आता हेही ऐकू मात्र त्यांनी जे दारिर्द्य रेषेखालील लोक आहेत त्यांच्या खात्यात एक हजार रुपये द्यावे. जेणेकरून ते लोक त्यादिवशी दिवाळी साजरी करतील, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. अॅड. आंबेडकर म्हणाले, तत्कालीन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना साक्ष नोंदविण्यासाठी पुन्हा बोलवावे, तसेच त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील साक्ष व्हावी, अशी मागणी चौकशी आयोगासमोर केल्याचे सांगितले.
हेही वाचा