चोरांचा प्रताप ! ओढ्यातून खेकड्यांच्या पाट्या लंपास | पुढारी

चोरांचा प्रताप ! ओढ्यातून खेकड्यांच्या पाट्या लंपास

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मच्छीमारांना खेकडे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. परंतु, भुरट्या चोरांचा या परिसरात उपद्रव वाढू लागला आहे. शेतकर्‍यांच्या कृषिपंपांसह ओढ्याच्या पाण्यात ठेवलेल्या खेकड्यांच्या पाट्याही ते चोरून नेत असल्याने शेतकर्‍यांसह आता मच्छीमारही त्रस्त झाले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात सध्या भुरट्या चोरांचा उपद्रव सुरू आहे. घोड, मीना नद्यांच्या किनारी असलेले वीजपंप, केबल, पाइप चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. आता हे चोरटे मच्छीमारांनी खेकडे पकडण्यासाठी पाण्यात ठेवलेल्या पाट्याही चोरून नेत आहेत. एका पाटीची किंमत 400 रुपये आहे. त्यात 2 किलो खेकडे सापडतात. त्यामुळे चोरटे खेकड्यांसह पाटी चोरत असल्याने गरिब मच्छीमारांचे सुमारे 1 हजार 200 रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे मच्छीमार बांधवही त्रस्त झाले आहेत.

भीतीपोटी पोलिसांत तक्रार नाही
वळती गावात खोडद (ता. जुन्नर) परिसरातील मच्छीमार खेकडे पकडण्यासाठी येतात. वळती येथील ओढ्यात त्यांना खेकडे मुबलक प्रमाणात मिळतात. खेकड्यांना 400 रुपये किलो असा बाजारभाव मिळतो. खेकडे विक्रीतून चांगले अर्थार्जन होत आहे. परंतु, खेकडे पकडण्यासाठी पाण्यात ठेवलेल्या पाट्यांची चोरी होऊ लागल्याने मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे मच्छिमार स्थानिक नसल्याने भीतीपोटी ते पोलिसांत तक्रार देत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे फावते.

Back to top button