नाटकं करणार्‍यांना जनता घरी बसवते ; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला | पुढारी

नाटकं करणार्‍यांना जनता घरी बसवते ; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चांगल्या तालमी केल्या तर प्रेक्षकांचा आशिर्वाद मिळतो, तसा आम्हालाही मिळतो, ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोकं घरी बसवतात, 2019 साली एक प्रयोग झाला ‘कट्यार पाठीत घुसली’, काळजात नाही, पाठीत घुसली. मग 2022 मध्ये आम्हीदेखील प्रयोग केला ‘आत्ता होती गेली कुठे’. असे प्रयोग होत असतात, असा अप्रत्यक्ष टोला रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी त्यांनी ही राजकीय टीकाटिप्पणी केली.

नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटले, असे विधान प्रशांत दामले यांनी शनिवारी केले होेते. हाच धागा पकडत जरा ही कला आमच्या राजकारण्यांनाही शिकवा ना. अनेकांना मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटून गेलं, की कितीतरी प्रश्न सुटतील. मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की, मला सिंहासन सिनेमा आठवतो. मात्र, सध्याच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही, मी कोणाबद्दल बोलतोय हीे सांगण्याचीही गरज नाही, असा चिमटाही फडणवीस यांनी यावेळी काढला.

राज्यातील सत्तांतरावर नेमकेपणाने बोट ठेवत फडणवीस म्हणाले की, 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती फिस्कटली. पर्यायाने, राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आणि भाजपसोबत त्यांनी सोयरीक करीत राज्यात सत्ता स्थापन केली. या राजकीय नाट्याकडेच एका अर्थाने फडणवीस यांनी लक्ष वेधले. नाट्यसंमेलनाचा हस्तांतरण सोहळा होतो. तर, आमच्याकडे शपथविधी सोहळा होतो. मात्र तेथे एक जण येतो तर दुसरा येत नाही, असा अनुभव येतो, असेही त्यांनी नमूद केले.

…कारण आम्ही तुमच्यातीलच झालो
राजकीय नेते 24 तास नाटकच करतात, या नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांच्या वक्तव्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय नेते नाटकं करतात म्हणजे आम्ही तुमच्यातलेच झालो. पूर्वी राजकीय नेत्यांना साहित्य संमेलन, नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर बोलावले की वृत्तपत्रांमध्ये मथळे छापून येत होते. आता परिस्थिती बदलली आहे.

Back to top button