..तर तोंड लपवायला जागा मिळणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

..तर तोंड लपवायला जागा मिळणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : कोविड काळात मयताच्या टाळूवरचे लोणी कोणी खाल्ले? असा प्रश्न उपस्थित करीत आम्हाला तोंड उघडायला लावाल तर तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, अशी थेट टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 'मिशन 48' राबविण्यात येणार असून, शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडूनच आणणार असल्याचे शिंदे यांनी मेळाव्यात सांगितले.

शिंदे शिवसेनेच्या वतीने राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघात शिवसंकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 6) शिरूर लोकसभा मतदारसंघात राजगुरुनगर येथे करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे बोलत होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि समर्थकांनी या मेळाव्याचे जोरदार आयोजन करून लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग फुंकल्याचे समोर आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनाला नियोजित वेळेपेक्षा तीन तास विलंब झाला, तरीही कार्यकर्ते, श्रोत्यांची सभास्थळी असलेली गर्दी कायम होती.

आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष बेताल आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण करीत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परकीय गुंतवणूकीत राज्य दुसर्‍या क्रमांकावर होते. उद्धव ठाकरे सत्तेत आल्यावर ही स्थिती तिसर्‍या क्रमांकावर गेली. आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग पळविल्याचे कांगावे खोटे आहेत. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही. सत्ता सोडून दीड वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना वाचली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी सभेला संबोधित केले. सेनेचे उपनेते इरफान सय्यद, शीतल म्हात्रे, जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, अरुण गिरे, तालुकाध्यक्ष राजूशेठ जवळेकर, रवींद्र करंजखिले, आळंदीचे शहरप्रमुख राहुल चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. योगिता भालेराव – पाचारणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संकुल, सभेकडे जाणारा महामार्ग, सभास्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

शोमॅन आढळराव !

पूर्वीच्या खेड आणि सध्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील तीन वेळा विजयी झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चाकण येथील विराट सभेचे जोरदार नियोजन करून आढळराव यांनी आपले यापूर्वी संघटन कौशल्य सिध्द केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात राबविल्या जाणार्‍या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात करताना शिरूरची जाणीवपूर्वक निवड केली. भाषणात तसा उल्लेखही त्यांनी केला. आजच्या सभेला जत्रेचे स्वरूप आले होते, तरीही सर्व कार्यक्रम नियोजनपूर्वक पुढे गेला. आजच्या विराट सभेच्या आयोजनाने आढळराव पाटील पुन्हा एकदा सभेचे शोमॅन ठरल्याची चर्चा सुरू होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news