Crime news : भागवतवस्ती येथील बंद बंगला फोडला | पुढारी

Crime news : भागवतवस्ती येथील बंद बंगला फोडला

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा :  कुरकुंभ-दौंड रस्त्यावरील (भागवतवस्ती) येथील बंद (बंगला) घर फोडून अज्ञात चोरट्यानी लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये २७ तोळ्याच्या सोन्याच्या वस्तू व रोख रक्कमेचा समावेश असल्याचे समजते. घटनेच्या दिवशी चोरमलेवस्ती, गोकुळनगर या दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजते. यापैकी एका ठिकाणाहून तब्बल १५० कबूतर चोरून नेले आहे. चोरी करून झाल्यावर घराच्या घरवाजाची कडी लावून अज्ञात चोरटे पसार झाले. हा प्रकार शुक्रवारी (दि.५) मध्यरात्री घडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुंभ-दौंड रस्त्यालगत भागवतवस्तीत दिलीप भागवत यांचे घर आहे. दिलीप भागवत यांची बहीण आजारी असल्याने तिला पाहण्यासाठी घरातील सर्व सदस्य गोव्याला गेले होते. दिलीप भागवत त्यांच्या फौजी हाॅटेलला होते. घरात कोणीही नव्हते. घराच्या दरवाजाला कुलूप लावले होते. अज्ञात चोरट्यांनी पहिल्यादा घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडले. मात्र, तो दरवाजा आतून बंद असल्यामुळे दरवाजा उघडता आला नाही. यानंतर समोरील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे दरवाजे उचकटून तोडून बाजूला करून सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम असा लाखो रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला. घटनास्थळी दुपारी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे आणि दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी भेट देऊन घराची पाहणी केली. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Back to top button