बेरोजगार कलावंतांनी काढला तमाशाचा फड | पुढारी

बेरोजगार कलावंतांनी काढला तमाशाचा फड

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा :  लोणी (ता. आंबेगाव) येथील कलावंतांनी तमाशाचा फड स्थापना केला. कोरोना काळानंतर बर्‍याचशा तमाशा फडांची अवस्था दयनीय झाली आहे. काही तमाशा फड बंद पडले. त्यामुळे लोणी धामणी परिसरातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. बेरोजगारीला कंटाळून लोणी ग्रामस्थ व ज्येष्ठ तमाशा कलावंतांच्या सल्ल्यानुसार तरुणांनी तमाशा फडाची स्थापना केली.
ज्येष्ठ कलावंत बबन पंचरास, सुभाष पंचरास, ज्ञानेश्वर विष्णू पंचरास, माऊली पंचरास पोंदेवाडीकर, रमेश खुडे, नरेश पंचरास, प्रशांत पंचरास, प्रवीण सुभाष पंचरास, नितीन पंचरास व संदीप शिवाजी पंचरास यांनी कै. शिवाजी विष्णू पंचरास व कै.काशिनाथ पंचरास या ज्येष्ठ तमाशा कलावंतांच्या स्मृतीची आठवण ठेवत तमाशा फड सुरू केला आहे.

त्याचे उद्घाटन बुधवारी (दि. 3) रात्री नऊ वाजता पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक लहु थाटे यांच्या हस्ते झाले. सरपंच सावळाराम नाईक, शरद बँक संचालक अशोक आदक पाटील, माजी सरपंच उद्धव लंके, समाजभूषण कैलासराव गायकवाड, पोलिस पाटील संदीप आढाव, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक चंद्रकांत गायकवाड, संचालक सतीश थोरात, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संतोष पडवळ, अनंत थोरात, संचालक बबनराव वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाळुंज, पारगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी नितीन जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. तमाशाचा कार्यक्रम पाहण्यासाठी तमाशाशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगन तात्या लंके यांनी फडासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यास प्रेक्षकांनी व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला.

Back to top button