

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : न्हावरा ते चौफुला रस्त्याच्या कामाचा तपशील दडवून दबाव व दहशतीने सुरू असलेल्या कामाला खोपोडी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. दै. 'पुढारी'च्या बातमीने ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण झाल्याने त्यांनी दै. 'पुढारी'चे आभार मानत कौतुक केले. खोपोडी ग्रामपंचायतीने ही रस्त्याचे काम त्वरित थांबवावी आणि त्याच्या शासकीय कागदपत्रांची माहिती आम्हाला द्यावी, अशी लेखी मागणी केली आहे.
या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून सध्या सुरू आहे. आठ महिन्यांचा कालावधी झाला तरी कामाने अजून वेग धरलेला नाही. रस्त्याच्या विस्तारीकरणात पारगावपासून चौफुल्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असणार्या किती जमिनी संपादित केलेल्या आहेत, रस्ता किती रुंदीचा असून, तो कशाप्रकारे करण्यात येणार आहे, यामध्ये डांबरीकरण आहे की काँक्रिटीकरण, मजबुतीसाठी ते कोणत्या पद्धतीने केले जाणार आहे, कामाची मुदत किती आहे आणि त्यावर खर्च किती होणार आहे या तपशिलाची माहिती शासन नियमानुसार लावणे आवश्यक असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अधिकार्यांनीसुद्धा याची दाखल घेतलेली नाही.
रुंदीकरणासाठी रस्त्यालगत असणार्या शेतकर्यांच्या जमिनी किती गेल्या याची माहिती त्यांना मिळत नाही, ठेकेदार कंपनी त्यांना दुसरीच माहिती देऊन दहशतीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. दै. 'पुढारी'ने याबाबत 'रस्ता कामाच्या तपशिलाची माहिती दडवली' अशी ठळक मथळ्यामध्ये बातमी छापल्यानंतर मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली. यातून खोपोडी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे काम बंद करून तत्काळ माहिती मिळावी, अशी मागणी केली आहे.