पुणे : पुढारी वृत्तसेवा : नऊवारी आणि फेटे परिधान केलेल्या महिला आणि पारंपरिक पेहरावातील पुरुष कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात निघालेल्या दुचाकी फेरीने (बाईक रॅली) शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या पुण्यातील कार्यक्रमांची शुक्रवारी (दि. 5) नांदी झाली. मराठी रंगभूमीवरील अजरामर शंभर व्यक्तिरेखांच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरापासून सुरू झालेल्या दुचाकी फेरीची स्वारगेटमधील गणेश कला क्रीडा मंचमध्ये सांगता झाली. ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या या फेरीमध्ये तीनशे दुचाकी, दहा रथांवर विराजमान ज्येष्ठ कलाकार आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या शंभर व्यक्तिरेखांच्या पेहरावातील कलाकारांचा सहभाग होता.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, विजय पटवर्धन, ज्येष्ठ अभिनेत्री रजनी भट, जयमाला इनामदार, दीपक रेगे, माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले, गिरीश ओक, शोभा कुलकर्णी, अभिजित बिचुकले यांच्यासह पुण्यातील कलावंत, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश कला क्रीडा मंच येथे रंगमंच पूजन तसेच प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन दिवसभराच्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा