कोल्हापूर : वर्षात 21.68 कोटींच्या ऐवजांवर चोरट्यांचा डल्ला

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

कोल्हापूर : स्थानिक सराईतांसह पोलिस रेकॉर्डवरील आंतरराज्य चोरट्यांनी शहर व जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मध्यवर्ती प्रमुख चौक, ग्रामीण भागातही बंद बंगल्यांना भरदिवसा टार्गेट करून चोरटे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह किमती ऐवजांवर डल्ला मारत आहेत. तरीही पोलिस यंत्रणा बेफिकीर आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या काळात जिल्ह्यात दरोडा, घरफोडीसह जबरी चोरींच्या 2 हजार 565 घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी तब्बल 21 कोटी 68 लाखांचा ऐवज लुटला आहे.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत शहर व जिल्ह्यात घरफोडीसह जबरी चोरीच्या गुन्ह्यांत कमालीची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दरोड्याच्या 11 गुन्ह्यांत 2 कोटी 35 लाख 14 हजार 992 रुपयांचा ऐवज लुटला गेला. दरोड्याच्या सर्व गुन्ह्यांचा छडा लागला असला तरी लुटलेल्या ऐवजापैकी केवळ एक कोटी 75 लाखांचा मुद्देमाल हाताला लागला आहे, हे प्रमाण 74 टक्क्यांवर आहे.

परप्रांतीय टोळ्यांचे आव्हान!

शहरातील मध्यवर्ती शिवाजी पेठ, नागाळा पार्क, रंकाळा परिसर, कदमवाडी, टेंबलाईवाडी, कसबा बावडा, राजारामपुरी, लक्ष्मीपुरीसह कळंबा, पाचगाव, उचगाव, उजळाईवाडी, आर. के. नगर परिसरात चोरट्यांनी थैमान घातले आहे. परप्रांतीय सराईत टोळ्यांचा शिरकाव झाल्याने चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.

चोरट्यांची दहशत कायम

जिल्ह्यात घरफोडी (424) व जबरी चोरी (112) अशा एकूण 536 घटना घडल्या आहेत. दोन्हीही घटनांमध्ये चोरट्यांनी 7 कोटी 86 लाखांच्या ऐवजांवर डल्ला मारला आहे. त्यापैकी 179 गुन्ह्यांतील दीड कोटीचा ऐवज हाताला लागला आहे. हे प्रमाण अवघ्या 16 टक्क्यांवर असल्याचे दिसून येते. दिवसागणिक घडणार्‍या घरफोडी, जबरी चोर्‍यांच्या घटनांमुळे चोरट्यांची दहशत दिसून येते.

365 दिवसांत चोरीचे दोन हजार गुन्हे!

जिल्ह्यात 365 दिवसांत दोन हजार 18 चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामधून चोरट्यांनी 11 कोटी 47 लाख 52 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. त्यापैकी 515 गुन्ह्यांचा पोलिसांना छडा लागला. तपासात 3 कोटी 62 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. रिकव्हरीचे हे प्रमाणही 27 टक्क्यांवर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news