कर थकबाकीपोटी 32 मिळकतींचा लिलाव आजपासून; लिलावाची प्रक्रिया सुरू | पुढारी

कर थकबाकीपोटी 32 मिळकतींचा लिलाव आजपासून; लिलावाची प्रक्रिया सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मिळकतकर थकविल्याप्रकरणी महापालिकेने सील केलेल्या 32 व्यावसायिक मिळकतींचा लिलाव करण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या मिळकतींकडे 16 कोटी रुपये थकबाकी आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली आहे. मिळकतकराची थकबाकी असलेल्या मिळकती सील करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात 200 हून अधिक व्यावसायिक मिळकती सील केल्या आहेत. यापैकी 32 मिळकतींची कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मिळकतधारकांकडे 16 कोटी रुपये थकबाकी आहे.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने आज शनिवारी (दि. 6) जाहीर प्रकटन देण्यात येणार आहे. 32 मिळकतींमध्ये खराडी, वडगाव शेरी, बाणेर परिसरातील दुकाने, कार्यालयांचा समावेश आहे. यासोबत पॅन कार्ड क्लबच्या काही जागेचाही लिलाव करण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेला चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकतकरातून आजअखेर 1 हजार 825 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीपासून आजतागायतपर्यंत 1 हजार 525 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 300 कोटी रुपये उत्पन्न अधिक मिळाले आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये मिळकत करातून 1 हजार 925 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. चालू वर्षीचे अद्याप तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. यासाठी कर आकारणी व संकलन विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button